हिंदीला तिसरी भाषा म्हणून लादण्यास दापोली मनसेचा तीव्र विरोध

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाराष्ट्र सरकारच्या हिंदीला तिसरी भाषा म्हणून मराठी जनतेवर लादण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कडाडून विरोध करणार आहे.

मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि अस्मितेच्या रक्षणासाठी हा लढा निर्णायक असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

मराठी भाषेचे प्रेम आणि अभिमान जपण्यासाठी राज्यभरातील शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र वितरणाची मोहीम मनसेने सुरू केली आहे.

या मोहिमेचा शुभारंभ दापोली येथे माजी जिल्हाध्यक्ष संतोष शिर्के यांच्या नेतृत्वाखाली आजपासून झाला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या संवर्धनासाठी व्यक्त केलेल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि शाळांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य मिळावे यासाठी ही पत्रे वितरित केली जात आहेत.

या उपक्रमात दापोली तालुकाध्यक्ष नितीन साठे, रत्नागिरी जिल्हा सचिव सचिन गायकवाड, शुभम शिंदे, अरविंद पुसाळकर, नदिम पठाण, मयुरेश वेल्हाळ यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

पत्र वितरणाबरोबरच शाळांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत चर्चा घडवून आणण्याचेही या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. मनसेने यापूर्वीही मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी विविध आंदोलने केली असून, या मोहिमेद्वारे मराठी अस्मितेचा आवाज आणखी बुलंद करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.

ही मोहीम राज्यभरातील विविध तालुक्यांमध्ये पुढे राबवली जाणार असून, मराठी जनतेला एकजुटीने या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन मनसेने केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*