रत्नागिरी दि. ३१ : रत्नागिरी जिल्हयातील कोविड १९ मुळे अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व सरंक्षणासाठी गठीत कृतीदलाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा व तालुकांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, अध्यक्ष बाल कल्याण समिती ॲङ विनया घाग, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती वीर आदि मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कोविड १९ मुळे अनाथ झालेल्या बालकांच्या घरी संबधित तालुक्यातील तहसिलदार व संबधित अधिकऱ्यांनी भेटी द्याव्यात. कोरोनामुळे एक पालक व दोन गमावलेल्या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. तालुकास्तरावर वात्स्यल्य मिशन योजने अंतर्गत कोविड मुळे विधवा झालेल्या व अनाथ बालके तसेच एक पालक असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना आवश्यक असलेल्या शासकीय योजनाचा लाभ मिळवून द्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील आणि बालकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्याबाबत उर्वरित बालकांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे पत्रव्यवहार करुन कार्यवाही करावी. तसेच उर्वरित दोन्ही पालक गमावलेल्या 4 बालकांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी तात्काळा कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.