संगमेश्वर : कोविड रुग्णांना उपचारादरम्यान येणारा  औषधांचा मोठा खर्च लक्षात घेऊन महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोशिएशनच्या माध्यमातून मातृमंदिरच्या ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला’ जवळपास 4 लाख किंमतीची औषधे असोसिएशनचे राष्ट्रीय पदाधिकारी आणि मातृमंदिरचे स्वीकृत संचालक यांनी मातृमंदिचे नाना कोळवणकर यांचेकडे दिली.

यातून येथील प्रत्येक कोविड रुग्णांसाठी पाच हजार रुपयाची औषधे मोफत देण्यात येणार असल्याचे मातृमंदिर कार्योपाध्यक्ष नाना कोळवणकर यांनी सांगितले.

वैजनाथ जागुष्टे हे देवरुख येथील मातृमंदिर आणि मावशी यांचे सोबत त्यांचे नाते अनेक दशकांचे. जागुष्टे हे केमिस्ट आणि ड्रगीस्ट क्षेत्रातील एक फार मोठे व्यक्तिमत्व आहे. देश पातळीवरील संघटनेचे ते सन्माननिय पदाधिकारी आहेत. आपल्या वरीष्ठ पातळीवरील ओळखीचा उपयोग आपल्या परिसराला व्हावा हा त्यांचा स्वभाव आहे.

‘मातृमंदिरचा रुग्णसेवेचा वारसा व याबाबतीत देवरुख परिसरात असलेली आपुलकी यामुळेच आम्ही असोसिएशनच्या माध्यमातून औषधांची मदत करताना विश्वासाने ‘मातृमंदिर कोविड सेंटरची निवड केली’ असं असोशिएशनचे राष्ट्रीय पदाधिकारी वैजनाथ जागुष्टे यांनी याप्रसंगी सांगितले. यापुढेही कोणत्याही प्रकारची औषधे लागल्यास असोसिएशन मदत करेल असं आश्वासन वैजनाथ जागुष्टे यांनी दिले.

याच वेळी त्यांनी 200 कोविड रुग्णांच्या एका दिवसाच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी आर्थिक मदत असोशिएशनच्या वतीने देण्याचे जाहीर केली. 

डॉ प्रकाश पाटील यांनी कोविड सेंटरची आतापर्यंतची रुग्णसंख्या, रिकव्हरी रेट आणि घेतली जाणारी काळजी याबाबत माहिती दिली. तसेच मातृमंदिरचे कार्योपाध्यक्ष सुनील कोळवणकर यांनी असोशिएशनचे आभार मानले.

यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष अनिल अणेराव, देवरुख केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.