दापोली नगरपंचायतीकडे लक्ष देण्याची मागणी
दापोली : दापोलीतील पटेल गेट आणि दर्ग्यामधील रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे टेम्पोचे टायर रुतल्याने अपघात घडला.
या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, दापोली नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील खड्ड्याकडे दुर्लक्ष केलं गेल्यानं वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
या अपघातामुळे झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
पटेल गेट आणि दर्ग्यामधील रस्ता हा वर्दळीचा असून, येथील रस्त्यावर पडलेला प्रचंड मोठा खड्डा गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्त करण्यात आलेला नाही.
या खड्ड्यामुळे वाहनचालकांना, विशेषत: रात्रीच्या वेळी, जीवघेणा धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत एका टेम्पोचे टायर या खड्ड्यात रुतले, ज्यामुळे वाहनाला नुकसान झाले.
या घटनेमुळे स्थानिक व्यापारी, नागरिक आणि वाहनचालकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे.
या खड्ड्याबाबत यापूर्वीही अनेकदा स्थानिकांनी नगरपंचायतीकडे तक्रारी नोंदवल्या होत्या.
मात्र, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने अखेर हा अपघात घडला.
नगरपंचायतीने तातडीने या खड्ड्याची दुरुस्ती करावी आणि रस्त्याची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यासोबतच, शहरातील इतर रस्त्यांवरील खड्ड्यांचाही प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
प्रशासनाने यापूर्वीच योग्य ती खबरदारी घेतली असती, तर हा अपघात टाळता आला असता. आता तरी नगरपंचायतीने तातडीने पावले उचलून खड्डे बुजवणे, रस्त्याची दुरुस्ती करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.