अबूधाबी येथील तज्ज्ञ आणि माजी विद्यार्थी इम्रान शेख यांचे रत्नागिरीत व्याख्यान

रत्नागिरी: मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे १ एप्रिल २०२६ रोजी “सागरी मत्स्यालयाचे व्यवस्थापन” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रीय मत्स्यालय, अबूधाबी येथील सागरी जीवशास्त्रज्ञ आणि मत्स्यालय तज्ज्ञ इम्रान शेख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक प्राध्यापक राकेश जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर प्राचार्य केतन चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. इम्रान शेख हे याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सागरी मत्स्यालय यशस्वीरीत्या चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला.

यामध्ये पाण्याची गुणवत्ता राखणे, विविध उपकरणांचा वापर, मासे आणि वनस्पतींची निगा, अन्न व्यवस्थापन, रोग नियंत्रण तसेच प्रकाश आणि फिल्ट्रेशन प्रणाली या विषयांची सविस्तर माहिती दिली. मत्स्यालयाच्या दीर्घकालीन यशासाठी त्याची नियमित देखभाल करणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिले.

जागतिक स्तरावर सागरी मत्स्यालयांची संख्या झपाट्याने वाढत असून, या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध असल्याचे शेख यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी योग्य तांत्रिक कौशल्ये आत्मसात केल्यास या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. व्याख्यानानंतर झालेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव येथील संशोधक, अधिकारी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*