दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या अभिजातपणाबद्दल काही महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर भाष्य केले.

लिखित साहित्य, ग्रंथ वगैरे साधने मराठी भाषेला समृद्ध बनवीतातच, पण कोणतीही भाषा अधिक समृद्ध करावयाची असेल, टिकवून ठेवायची असेल तर अधिकाधिक लोकांनी ती नित्य व्यवहारात बोलावयास हवी, वापरावयास हवी.

‘महाराष्ट्र गीतकार’ कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण गेल्या काही वर्षांपासून ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करीत आहोत. मात्र एखाद्या अशा दिवशी आपण मराठीचा ‘राजभाषा’ म्हणून गौरव करीत असलो तरी तो तेवढ्या दिवसापुरताच होता असे खास जाणवत होते.

आपण दैनंदिन जीवनात या भाषेला राजभाषा मानत होतो का हा गंभीर प्रश्न अनेक वर्षांपासून माझ्या मनाला सतावीत होता. अगदी बाजारातून एखादी वस्तू खरेदी करताना समोरचा विक्रेता मराठी की अमराठी भाषिक आहे याचा विचार न करता आपल्या ओठांवर ‘टुटी फुटी’ हिंदी अगदी सहज बाहेर पडते.

एखाद्या दिवशी ‘मराठी-मराठी’ करताना सुखावणारे आपण दुसऱ्याच दिवसापासून मराठीकडे का पाठ फिरवतो ते कळतही नाही. पण हे सारे आता नित्याचेच झाले आहे.

अशा हिंदी किंवा इंग्रजाळलेल्या ‘मी पणा’ची सुरुवात अगदी आपल्या घरापासून होते. आपण पुर्वी आपल्या शालेय जीवनात हलाखीच्या गरीबीत वाढलो. मनासारखे शिकता आले नाही.

तसे शिकता आले असते तर आज आपण डॉक्टर वगैरे असतो, नोकरीत मोठ्या हुद्द्यावर असतो वगैरेची खंत आपणास तीव्रतेने जाणवू लागते. आपल्याच एखाद्या भाऊबंदाची मुंबईत ‘मिशनरी स्कूल’ किंवा ‘कॉन्व्हेंट’ मध्ये शिकणारी मुले मे महिन्यात महिनाभरासाठी गावी आल्यावर ‘फाडफाड’ इंग्रजी बोलतात तेव्हा आपणास त्यांच्यासमोर खजील झाल्यासारखे वाटू लागते.

आपल्या मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची लाज वाटू लागते. मग तिथूनच मनाची मनाशी स्पर्धा सुरु होते. काहीही करीन, कसेही करीन पण मुलांना इंग्लिश मीडियममध्येच शिकवीन हा अट्टाहास तिथूनच सुरु होतो. मुळात जी भाषा जन्मल्यानंतर आपल्या आईकडून किंवा घरात शिकतो, आपल्या कुटुंबात शिकतो, खरेतर तीच भाषा आपल्या ओठांवर आपसूक येते, अगदी सहज कळते, अंगवळणी पडते.

अनेक विचारवंतांनी हाच मुद्दा अधिक अधोरेखित करताना म्हटले आहे की, मातृभाषेतून मिळालेले शिक्षण व संबोध चिरकाल किंवा आयुष्यभर टिकतात. मातृभाषेतून मिळालेले शिक्षण अधिक प्रभावी व परिणामकारक सिद्ध होते.

मात्र इतरांचे अंधानुकरण आणि जगाच्या व्यवहाराची भाषा आत्मसात करण्याच्या नादात आपल्या मराठीकडे पाठ फिरवतो.

परवा ‘आपली मराठी-अभिजात मराठी’ याच विषयावर आधारित कोमसापने आयोजित केलेल्या एका विभागस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मराठी माध्यमाबरोबरच इंग्रजी माध्यमात शिकणारे अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.

त्यांपैकी अनेकांचा असाच सूर होता, आपण आपल्या दैनंदिन जीवनात मराठीचाच वापर केला पाहिजे. आपण आपल्या घरापासून मराठी संभाषणाची सवय लावून घ्यावयास हवी.

घरात मम्मी पप्पा न म्हणता ‘आई-बाबा’ अशीच साद घालावयास हवी. शाळेत सर मॅडम न म्हणता ‘गुरुजी’ बाई’ म्हणावयास हवे.

याशिवाय ‘नमस्ते गुरुजी, नमस्ते बाई, शुभ सकाळ गुरुजी, बाई वगैरे वगैरे. एक परिक्षक म्हणून अशा भाषणांचे परिक्षण करताना मला ही अशी भाषणे ऐकताना हसू आवरले नाही.

मात्र त्या विद्यार्थ्यांची कीव अशासाठी वाटली की, ती इंग्रजी माध्यमात शिकतात, त्यात त्यांचा काय दोष? तसेही त्यांना कुठले स्वातंत्र्य आपण कोठे शिकावे, कोणत्या माध्यमातून शिकावे, मोठेपणी कोण व्हावे? दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या भाषेस ‘अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला.

नाणे घाटात मिळालेल्या एका शिलालेखातील मजकूर या कामी परिणामकारक ठरला. तब्बल अडीच हजार वर्षांपुर्वी तो घाट बांधण्यात आला होता. त्यावरून सिद्ध झाले की, शालिवाहन राजवटीत किंवा त्यापुर्वी देखील ‘महऱ्हाटी’ भाषा व्यवहारात होती.

बोलली, लिहीली जात होती. दरम्यान मध्यंतरी अनेक वर्षांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी होतीच.

मात्र अशाच काही ‘तांत्रिक’ बाबींमुळे तसा योग जुळून येत नव्हता. मात्र मराठीचे घोडे अखेर एकदाचे गंगेत न्हाले आणि मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. आता प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी अनेक पटींनी वाढली आहे.

मराठ्यांनी त्यांचे निशाण अटकेपार फडकवीले होते. आता आपण आपल्या मराठीचा झेंडा तसाच जगभरात फडकवावयास हवा.

– बाबू घाडीगांवकर, दापोली