दापोली: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोकण विभागातर्फे दापोली येथील सेवावृत्ती शिंदे गुरुजी सभागृहात १३ एप्रिल रोजी भव्य मेळावा आणि शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “शिक्षक समिती जिथे बोलावते, तिथे मी हजर असतो. अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचे मूळ कामात अडथळे येतात. संचमान्यता आणि शिक्षकांच्या सर्व मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
त्यांनी जुन्या पेन्शन योजनेचा लाभ महायुती सरकारच देऊ शकते, असेही नमूद केले. तसेच, मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक घेऊन शिक्षकांच्या मागण्यांना न्याय देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
राज्यमंत्री योगेश कदम यांनी शिक्षकांना अशैक्षणिक कामांमुळे येणाऱ्या अडचणींवर भाष्य केले. ते म्हणाले, “शासकीय कर्मचारी कधीच नाखुशीने काम करत नाहीत, परंतु अशैक्षणिक कामांमुळे त्यांच्या मूळ कामात अडथळे येतात.कोणतीही शाळा बंद होणे शोभनीय नाही. कोकणातील डोंगरी निकष आणि शिक्षकांच्या मागण्यांसाठी मी प्रयत्नशील आहे.”

त्यांनी पुढील दोन दिवसांत मंत्र्यांसोबत बैठक घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी शिक्षक नेते उदय शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, विजयकुमार पंडित यांनी मंत्र्यांसमोर शिक्षकांच्या मागण्या मांडल्या.
कोकण विभाग अध्यक्ष अंकुश गोफणे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. जिल्हानिहाय संघटनात्मक आढावा आणि शिक्षक-विद्यार्थी समस्यांवर चर्चा झाली.

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी दिपक शिंदे, दिलीप महाडिक, संतोष पावणे, दिलीप मोहिते, शरद भोसले, सुनील दळवी, स्वप्नील परकाळे, नरेंद्र उकसकर, विजय क्षिरसागर, विठ्ठल कुठेकर, विश्वास भोपे, शशिकांत शेळके, अनिलकुमार मळगे, संजय माने, अरुण सोनवणे, गुलाब आहिरे, भरत शिद यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संतोष पावणे यांनी, तर आभार प्रदर्शन रुपेश जाधव यांनी केले.