भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

रत्नागिरी : सत्तेच्या आणि आर्थिक जोरावर सध्या सर्वत्रच पत्रकारांची गळचेपी होत आहे. चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना ओळखले जाते मात्र आता पत्रकारांच्या स्वतंत्र लेखणीवर विविध स्तरातून बंधने आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.

समाजात जे घडत त्याचे वस्तुनिष्ठ वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अलीकडे विविध गुन्ह्यात अडकवण्याचे कामही सुरू आहे. या विरोधात रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी एका छताखाली एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर २ तास आंदोलन करून सर्व यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले.

पत्रकारांवर असेच अन्याय होत आहेत, कोणतीही शहानिशा न करता प्रत्येक गोष्टींसाठी पत्रकारांना जबाबदार धरणे अतिशय चुकीचे आहे.

पत्रकारांच्या आंदोलनाला पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू भैय्या सामंत यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला

लोकमान्य टिळकांनी केसरीच्या माध्यमातून इंग्रजांवर तोफ डांगली म्हणून तर बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रात दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून पत्रकारांची चळवळ उभी केली. अशा महाराष्ट्रात सगळीकडेच कोणत्या ना कोणत्या माध्यमाद्वारे गळचेपी करण्याचा प्रयत्न होत असून या विरोधात वेळीच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

रत्नागिरी जिल्ह्यातही कोणा पत्रकारांवर अन्याय झाल्यास जिल्हा प्रशासनाने त्वरित कारवाई करून सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली.

दिवसेंदिवस पत्रकारांच्या कामकाजात अवांतर लोकांचा हस्तक्षेप वाढत आहे, वेळीच या गोष्टीला आळा बसला पाहिजे, अशी आमची सर्वांची मागणी असल्याचे सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांना सांगितले. एखाद्या पत्रकारांवर अन्याय झाल्यास सर्व पत्रकार एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येऊ शकतात हे सोमवारी रत्नागिरीतील पत्रकारांनी दाखवून दिले.

पत्रकारांवर दबावशाही वाढत आहे, या दडपशाहीचा निषेध सर्व पत्रकारांनी विविध घोषणा देत केले.

या पत्रकारांच्या आंदोलनाला आमदार राजन साळवी, उद्योजक किरण सामंत राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये मिलिंद किर, निलेश भोसले, आंबा बागायदार प्रकाश उर्फ भावा साळवी , ऍड. विलास पाटणे तसेच व्यापारी संघटनेचे गणेश भिंगार्डे, अमेय वीरकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.