कोरोना विषाणू साथीच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश जारी केले आहे. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वा. पासून हे आदेश लागू झाले आहेत. दोन महिन्यापेक्षा कमी किंवा पुढील आदेश होइपर्यंत लागू राहणार आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भाव आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५, भारतीय साथ रोग नियंत्रण-१८९७, महाराष्ट्र कोव्हिड-१९, उपाययोजना नियम २०२० ची अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी दत्ता भडकवाड यांनी हे आदेश ६ ऑक्टोबर रोजी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या बाबी जिल्ह्यातील शाळा,कॉलेज, प्रशिक्षण संस्था, शिकवणी देणाऱ्या संस्था ३१ ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील. चित्रपट गृहे, जलतरण तलाव,मनोरंजन पार्क,नाट्यगृह, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स सह, ऑडीटोरियम यासारखी तत्सम ठिकाणे बंद रहातील. सर्व सामाजिक, राजकिय,धार्मिक कार्य, करमणूक, शैक्षणिक, संस्कृतिक, इतर मेळावे, धार्मिक सभा/ परिषदांना यांना बंदी असेल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.