आज दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : संपूर्ण शहराची तहान भागवणाऱ्या शीळ पाणीपुरवठा योजनेची जॅकवेल कोसळल्यानं शहरवासीयांसमोर मोठं पाणी संकट उभं राहिलं आहे. मात्र आता नवीन जॅकवेल चालू करण्यासाठी सुमारे १५ ते २० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
पण यावर तातडीनं उपाय योजना म्हणून पालकामंत्री उदय सामंत यांनी शहराला आज दुपारपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे एमआयडीसी विभागाला आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान शीळ येथील जॅकवेल कोसळत असताना आतमधील कामगार थोडक्यात बचावले आहेत. ते तातडीनं जॅकवेल बाहेर पडल्यानं ते सुखरूप आहे. या गडबडीत त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे.
आज पहाटे जॅक वेल कोसळतच माजी नगरसेवक निमेश नायर आणि नगर पालिका अधिकारी आणी कर्मचाऱ्यांनी शीळ धरणाकडे धाव घेतली. सध्या नवी जॅकवेल बांधून पूर्ण झाली आहे. ही नवी जॅकवेल जरी जलद गतीने सुरु करायची म्हटली, तरी १५ ते २० दिवसांचा अवधी लागू शकतो, अशी माहिती नगर परिषदेच्यावतीने देण्यात आली.
‘MIDC’ला पाणी पुरवठा करण्याचे उद्योग मंत्र्यांनी पहाटेच दिले आदेश
जॅकवेल कोसळल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना देण्यात आली. गणेशोत्सवाची धामधूम लक्षात घेता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पहाटे 5 वाजता एमआयडीसी सीईओ बिपीन शर्मा यांना आदेश दिले व रत्नागिरी शहराला रोज 10 MLD पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
या तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे आज दुपारनंतर रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी माय कोकण जवळ सांगितले आहे.
पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू
शहरातील पाणी पुरवठा करण्याच्यादृष्टीने नगर परिषदेने पावलं उचलायला सुरूवात केली आहे. पण रत्नागिरी मध्ये नवीन पाईपलाईन योजना झाल्यानंतर एमआयडीसीच्या माध्यमातून पूर्ण शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे?
एमआयडीसी आणि रत्नागिरी नगरपरिषद यांच्या कनेक्शन्समध्ये ताळमेळ बसवता येऊ शकेल का याची चाचपणी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केली आहे.
खालच्या भागात शहरातील खालच्या भागांमध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्यवस्थितत होऊ शकेल पण इतर भागांच्या बाबतीत ही यंत्रणा राबवणं तेवढंच सोपं नसणार आहे, याची जाणीव नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला आहे.
स्टोरेज टाक्यांमध्ये आधी पाणी भरून मग शहराला पाणीपुरवठा करणं सोपे होईल. यासाठी एक दिवस आड पाणीपुरवठा करणं अधिक सोयीस्कर असेल, हे देखील तज्ञ मंडळी सांगत आहेत.