मुनाफ वाडकर यांनी केलं उत्कृष्ट मार्गदर्शन

दापोली: इकरा मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी आणि जेट्स जामिया एज्युकेशनल अँड ट्रेनिंग सोसायटी, दापोली यांच्या संयुक्त विद्यमानं दापोलीतील रसिक रंजन हॉलमध्ये 10वी, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि प्रेरक चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंं. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक मुनाफ वाडकर यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं.

मुनाफ वाडकर यांनी विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमधील 200 हून अधिक डिग्री आणि अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पगाराचा विचार न करता आधुनिक काळात ज्ञानसंपन्न होण्यासाठी शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. “विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडताना पालक, शिक्षक आणि करिअर समुपदेशकांशी संवाद साधून योग्य नियोजन करावे. चिकाटी आणि मेहनतीने यश नक्कीच मिळेल,” असे वाडकर यांनी नमूद केले. तसेच, करिअर निवडीसाठी आवश्यक असलेल्या नियोजन आणि व्यावसायिक दृष्टिकोनाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं.

या कार्यक्रमात डॉ. ताबिश परकार यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव आणि विचार मांडले. डॉक्टर होण्यासाठी लागणारी चिकाटी, जिद्द आणि संयम यांबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी आयोजकांनी त्यांचा विशेष सन्मान केला.

कार्यक्रमाला दापोलीतील नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, यू.ए. दळवी इंग्लिश मिडीयम स्कूल, अजीज मुल्ला पब्लिक स्कूल आणि म.इ.स. वुमन डिग्री कॉलेज येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन जावेद मणियार, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला, माजी विस्तार अधिकारी ताजुद्दीन परकार, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान मोमिन यांनी केले, तर ताजुद्दीन परकार यांनी आभार प्रदर्शन केले.