रत्नागिरी दि.03:- मत्स्यव्यवसाय विभागामार्फत व सागरी सुरक्षा यंत्रणेमार्फत मासेमारी नौकांची तपासणी वेळोवेळी करण्यात येते.  अशा मासेमारी नौकांवर कार्यरत असलेले नौकामालक, तांडेल व खलाशी यांचे मूळ ओळखपत्र, नौकेची नोंदणी प्रमाणपत्र, मूळ मासेमारी परवाना, विमाच्या प्रती तसेच नौकेवरील तांडेल व खलाशी यांची मालकानुसार (VRC) जीवन रक्षक साधने, अग्निशामन साधने नसल्याचे आढळून येत आहे.  सदर बाब ही सागरी सुरक्षेच्या दृष्टीने व मच्छिमारांच्या जिवीतहानी टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
याकरीता मासेमारीसाठी समुद्रात नौका जात असताना नौकांवर असलेले नौकामालक, तांडेल व खलाशाचे मूळ ओळखपत्र ठेवण्यात यावे.  नोंदणी प्रमाणपत्रानुसार नौकेवर जास्त तांडेल व खलाशी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.  अतिरिक्त तांडेल किंवा खलाशी आढळल्यास सागरी सुरक्षेयंत्रणेमार्फत अतिरिक्त तांडेल/खलाशांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. 
 मच्छिमारांनी नौकेवर जीवरक्षक साधनांसमवेत यांत्रिक नौकांवर  VTS (VESSEL TRACKING SYSTEM), AIS (AUTOMATIC INDENTIFICATION SYSTEM) DAT (DISTRICT ALERT TRANSMITTER)  इत्यादी यंत्रप्रणाली बसविणे आवश्यक आहे.  सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या होत असलेल्या मासेमारीस आळा घालणे तसेच शाश्वत मासेमारी टिकून ठेवणे व सागरी सुरक्षेच्या हेतू लक्षात घेता प्रत्येक मासेमारी नौकेवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावा. नौका मालकाने नौकेच्या इतर कागदपत्रासह नौकेचा व नौकेवरील खलाशी यांचा यथायोग्य विमा काढण्यात यावा तसेच सदरील नौका समुद्रामध्ये मासेमारी करण्यास योग्य असल्याबाबत नौकेचे प्रमाणपत्र मासेमारी करताना संबंधित नौकेवर असणे बंधनकारक आहे.  जेणेकरुन समुद्रामध्ये कोणतीही दुर्घटना घडल्यास दुर्घटनाग्रस्त नौका व त्यावरील खलाशी यांना नुकसानभरपाई मिळणे सहज शक्य होईल.
 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 84 मासळी उतरविण्याची केंद्रे असून त्यामधील 46 बंदरे अधिसूचित बंदरे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. उर्वरित मासळी उतरविण्याच्या केंद्रावर पर्यायी व्यवस्था म्हणून काही प्रमाणात मासळी उतरविली जाते. सदर 46 मासळी उतरविण्याच्या केंद्रापैकी 21 मासळी उतरविण्याच्या केंद्रावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  सदर नियुक्ती ही राज्याच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर व मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यांसाठी मच्छिमार नौकांचा वापर केल्यामुळे मासेमारी नौकांचे अवागमन व त्यावरील खलाशांची माहिती घेणे, नौकांची नोंदणी करणे व या सर्वांसाठी टोकन पध्दत राबविण्याकरीता सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.  सदर सुरक्षा रक्षकामार्फत प्रत्येक मासेमारी नौका प्रत्येक वेळी मासेमारीस समुद्रात जाताना विधीग्राह्य कागदपत्रांची खलाश्यांची तसेच नौका हालचाल नोंदवहीतील बाबनिहाय नोंद घेवून सदर नौकेस टोकन देण्यात येईल. सदर नौका मासेमारी करुन मासळी उतरविण्याच्या केंद्रावर परत आल्यानंतर टोकन जमा करताना पुन्हा सर्व नोंदी सुरक्षा रक्षक यांचेमार्फत तपासण्यात येतील व त्याची नोंद हालचाल नोंदवहीत घेतील.  तरी सदर बाबींची दक्षता सुरक्षा रक्षकांबरोबरच मच्छिमारांनी घेणे आवश्यक आहे.  मासेमारी बंदी कालावधीमध्ये कोणतीही यांत्रिकी नौका मासेमारीस जाणार नाही याबाबत देखील सर्व मच्छिमारांनी दक्षता घ्यावी व सुरक्षा रक्षकांनी सदर नौका बंदी कालावधीत मासेमारीस जाण्यास प्रतिबंध करतील. आपत्कालीन परिस्थितीत आलेल्या सूचना/संदेश मच्छिमारांना सुरक्षा रक्षक पोहोचवतील.  सागरी सुरक्षेच्या दृष्टीने व जिवीतहानी टाळण्याकरीता सर्व मच्छिमारांनी वरील सर्व बाबींची पूर्तता करुनच मासेमारीस जावे.  अन्यथा याबाबत भविष्यामध्ये कोणतीही दुर्घटना/अपघात घडल्यास यासाठी नौका मालक यांना जबाबदार ठरविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी सूचित केले आहे.