दापोली – मला आजही दापोली अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी असेच वाटत आहे, कारण निवडणुकीमुळे बँकेवर १५ लाखांचा अधिकचा बोजा पडणार आहे. त्यामुळे मी निवडणुकीला सामोरे जायला घाबरत आहे, असा अर्थ कोणीही काढू नये, अशी प्रतिक्रीया जयवंत जालगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सर्वसाधारण गटातून चंद्रशेखर जोशी यांचा छाननीत अवैध ठरलेला उमेदवारी अर्ज अपिलात सहकार आयुक्तांनी वैध ठरवल्यामुळे बँकेची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर जयवंत जालगावकर यांनी प्रसिद्धी पत्रक काढून आपली भूमिका सविस्तरपणे स्पष्ट केली आहे. यामध्ये ते म्हणतात,

दापोली अर्बन को. ऑप. बँक लि. दापोली या बँकेच्या निवडणुकीसंदर्भात अपिलीय न्यायाधिकारणाने दिलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. वास्तविक बँकेच्या मंजूर पोटनियम 40 मधील तरतुदी अगदी स्पष्ट आहेत.

या नियमातील 40 (2) नूसार निवडणुकीत भाग घेणाऱ्या उमेदवाराकडे निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याच्या 60 दिवस अगोदर बँकेचे रु. 20,000/- चे शेअर्स असणे व 2023 ते 2028 या कालावधीसाठी त्याच्या स्वतःचे नावे एक लाख रकमेची पाचवर्षे मुदतीत ठेव असणे बंधनकारक आहे, हे त्या पोटनियमात अभिप्रेत आहे.

या नियमानुसार एक-दोन वर्षे मुदतीकरिता ठेवी ठेवून त्याचं नुतनीकरण करून पाच वर्षे  मुदत पूर्ण केलेल्या ठेवी अपेक्षित नसून तर निवडणूकीपासून पुढील सलग  5 वर्षांसाठी या ठेवी असणं आवश्यक आहेत.

आज आचारसंहिता लागू असल्यामुळे मी आयुक्तांच्या निर्णयावर कोणतेही भाष्य करणार नाही. मात्र निवडणूक आचार संहिता संपल्यानंतर पत्रकार परिषद घेवून सत्य काय आहे, ते बँकेच्या भागधारक सभासदांसमोर आणणार आहे.

आयुक्तांचा निर्णय काहीही झाला असला तरी आजही बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, हिच माझी भूमिका आहे. यामुळे कोणत्याही उमेदवाराला विनंती करावी लागली तरी ती माझी मानसिकता राहिल.

वृत्तपत्रांमध्ये, वॉट्सॲपवर बातम्या प्रसिद्ध झाल्यावर मला अनेक सभासद व हितचिंतकांचे फोन आले आणि तुम्ही निडवणुकीला का घाबरताय? मत आम्ही देणार आहोत.
एवढी वर्षे तुम्ही बँक कशी चालवताय, बँक कोठे नेऊन ठेवलीत, हे आम्ही पाहतोय. त्यामुळे कोणाला निवडून द्याचं हा अधिकार आमचा आहे. मते देताना कोणाला द्याची ते आम्ही बघू, निवडणूक होऊ दे अशी मते मांडली.

प्रश्न निवडणुकीला सामोरे जावून घाबरण्याचा अजिबात नाही. गेली अनेक वर्षे पारदर्शकपणे बँकेचा कारभार केलेला असल्यामुळे त्यामध्ये ठेवीदारांच्या ठेवींचं रक्षण करुन त्या सुरक्षित ठेवणे, सभासदांसाठी विविध योजना राबविणे, मग त्या कर्ज योजना असोत, ठेव ठेवणारे ठेवीदारांच्या सुरक्षिततेचा असोत, सभासदांच्या अपघात विम्याचा असो किंवा कर्जदारांच्या अपघात विम्याचा असो, अशा सभासदांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत.

आज मी निवडणुकीसाठी जे पॅनल केलं आहे, ते कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा जाती धर्माचे नसून ४० हजार सभासदांमधून सर्व समाजघटकांना प्रतिनिधत्व देणाऱ्या प्रतिनिधींचे पॅनल आहे. त्या 40 हजार सभासदांचा विश्वास सार्थ ठरविण्याचे काम त्यांना करावयाचे आहे. यापूर्वीही सभासदांनी निवडून दिलेल्या माझ्या नेतृत्वाखालील संचालकांनी ते विश्वासाने केले आहे. हे सर्व सभासदांना माहिती आहेच.

आजही बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी कोणालाही विनंती करायला तयार आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की, मी बँकेच्या निवडणुकीला समोरे जायला घाबरत आहे. असे मुळीच नाही. पण कोणाच्या हट्टापाई बँकेवर अनावश्यक पंधरालाख रूपयांच्या निवडणूक खर्चाचा बोजा पडू नये, ही माझी भूमिका आहे.

निवडणुकीत वाचवलेला तो निधी दापोली तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक गरजा भागविणेसाठी वापराता यावा हा त्यामागील मुख्य हेतू आहे.


सुमारे 25 वर्षापूर्वी आम्ही घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे दापोलीत आज दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज दिमाखात उभे आहे व त्या कॉलेजमध्ये सामान्य कुटुंबांपासून ते सधन कुटुंबातील मुले सायन्स फॅकल्टीचे ज्ञानार्जन करित आहेत. आज या कॉलेजमधून दरवर्षी एक चांगली शिक्षित पिढी बाहेर पडत आहे.

मला बँकेच्या माध्यामातून अशा अनेक गोष्टी अजूनही करावयाच्या आहेत आणि त्यासाठीच अनावश्यक खर्च टाळावा म्हणून मी नम्रतेची भूमिका स्विकारीत आहे.

जो पर्यंत बँकेचा भागधारक सभासद, मग तो सामान्यातील सामन्य माझा रिक्षाचालक असो, व्यापारी-उद्योगपती हे सर्व माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत निवडणुकीला सामोरे जाण्यास मी अजिबात घाबरत नाही. निवडणूक बिनविरोध करण्यामागची माझी भूमिका आपल्या बँकेचा लाखो रूपयांचा होणार अनाठाई खर्च वाचवून तो चांगल्या कामाकडे कसा वळविता येईल हीच आहे.

आपला,
जयवंत शं. जालगावकर