भाग – १
शिधासामुग्रीसह धोतरात बांधलेले पातेले पाठीवर घेवून सह्याद्रीचे कडेकपारी, गडकोट आणि ऐतिहासिक रानवाटा तुडवण्याची सुरुवात वयाच्या दहाव्या वर्षीच झालेली.

सह्याद्रीच्या कधी कुशीत, तर कधी अंगा-खांद्यावरुन भटकताना माझा मी कधीच रहात नाही. एक वेगळीच ऊर्जा या भटकंतीत संचारलेली असते.

पण, आयुष्याच्या उत्तरार्धात किंवा मध्यावर कधीतरी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या कुशीत— म्हणजेच ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ (EBC) वर— आपण पाऊल ठेवून उभे राहू, तेथे जोर मारु, असा विचार अगदी स्वप्नाजवळही आजू-बाजूला भटकला नव्हता.

एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली व्यक्ती सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे एवढीच काय ती माहिती माझ्या सर्वसाधारण ज्ञानात होती.

प्रतिवर्षी किमान दोन नवीन अनवट जागा शोधून तिथे भटकंती करायची, हा माझा आणि सौ चा (पत्नी डाॕ सुप्रिया) गेल्या कित्येक वर्षांचा ठरलेला शिरस्ता! मात्र, गेल्या दोन वर्षांतील कामकाजामुळे  आणि वेळेअभावी यात खंड पडला होता.

त्या दोन वर्षांतील उरलेली कसर भरून काढण्यासाठी आम्ही ‘लेह-लडाख’च्या मोहिमेची जय्यत तयारी सुरू केली होती. त्या थंड वाळवंटाचे नकाशे आणि माहिती गोळा करण्यात आम्ही दोघेही गुंतलो होतो.

नेमकी याच काळात रत्नागिरी प्रशासनातील माझे सहकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्याशी दररोज जीम, समुद्रकिनारी फिरणं, हाफ मॕरेथानची तयारी, या निमित्तानं दररोजचा सहवास वाढला.

सह्याद्रीच्या रौद्र रूपाशी त्यांची झालेली गट्टी थक्क करणारी होती. मांगी-तुंगी, तोरणा ते राजगड असा अंगावर काटा आणणारा ट्रेक, तोही वादळी वारे आणि कोसळत्या धारांत, सलग सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत त्यांनी पूर्ण केल्याचे ऐकून मी अचंबित झालो होतो. एवढ्यावरच न थांबता, महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर ‘कळसुबाई’ देखील सर करून आले होते.

अशातच एक दिवस मोबाईलवर रिल्स पाहता पाहता आमच्या गप्पा एका वेगळ्याच वळणावर गेल्या. गप्पांच्या ओघात ते अचानक म्हणाले, “सातपुते साहेब, मला ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ करायचा आहे!” त्यांच्या या धाडसी इच्छेला बळ देत मी म्हणालो, “माझी मैत्रीण मनीषाने हा ट्रेक पूर्ण केलाय.

” मी तात्काळ त्यांना मार्गदर्शक दीपक सावेकर यांचा संपर्क क्रमांक दिला. गायकवाड साहेबांनी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा समजले की, दीपकरावांची कन्या कस्तुरी हीच या कठीण ट्रेकचे नेतृत्त्व करत असून एक बॅच घेऊन जात आहे. त्यानंतर गायकवाड साहेब कस्तुरीशी पुढील नियोजनाबाबत चर्चा करण्यात पूर्णपणे गुंतले.

आम्ही मात्र, आमचा ‘लेह-लडाख’चा प्लॅन कसा यशस्वी करता येईल, आपल्याला सोयीस्कर तारखा कोणत्या, याच तयारीत होतो. तब्बल आठ दिवसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर गायकवाड साहेबांचा कस्तुरीशी संपर्क झाला आणि ईबीसी ट्रेकची खडान् खडा माहिती त्यांच्या हाती आली. आता त्यांची अधिकृत तयारी सुरू झाली.

आम्ही दोघेही २१ किमी मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, अल्ट्रा मॅरेथॉन आणि सांगलीत पार पडलेल्या कठीण ‘ड्युएथ्लॉन’ (Duathlon) च्या निमित्ताने रोज सकाळी किंवा संध्याकाळी सरावासाठी भेटत असू. या सरावाच्या दरम्यान ‘ईबीसी’च्या गप्पाच जास्त रंगायच्या.

गायकवाड साहेबांचा आता कसून सराव सुरू झाला होता. रोजचा आहार काय असावा, व्यायामाचा क्रम कसा असावा, याचे काटेकोर नियोजन त्यांनी केले होते. त्यांनी आपली सीटही आरक्षित केली होती. मे महिन्यातील १५ तारीख निश्चितही झालेली. त्यांच्या तयारीचा मी साक्षीदार होतो. त्यांच्या या ट्रेकविषयी मी लिहीणार असेही त्यांना आवर्जून सांगितले होते.

मार्च महिन्यात, एका संध्याकाळी सराव करताना त्यांनी मला थेट विचारले, “तुम्ही येताय का माझ्यासोबत ईबीसीला?” मी नेहमीप्रमाणे हसून म्हणालो, “नाही साहेब, आमचे लेह-लडाख ठरले आहे.”

पण, त्या रात्री घरात एक वेगळेच नाट्य घडले. मी घरात जाताच सौ. ला सहज म्हणालो, “आपले गायकवाड साहेब ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ला चालले आहेत.” बस, एवढा एकच शब्द पुरेशा होता! आम्ही दोघांनी उत्सुकतेपोटी यू-ट्यूबवर ईबीसीचे व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली.

तिथले ते विहंगम दृश्य, बर्फाच्छादित शिखरे आणि थ्रिल पाहून आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सौ. ने तर एक पाऊल पुढे टाकत थेट कस्तुरीशी संपर्क साधला. सर्व माहिती घेतली. पैसे ट्रान्सफर केले आणि थेट विमानाचे तिकीटच बुक करुन टाकले.

लेह-लडाखच्या थंड वाळवंटाकडे जाणारे आमचे पाय एका क्षणात साहसी पर्यटनाकडे वळले. जगातील सर्वात साहसी अशा ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’च्या रोमहर्षक वाटेवर आम्ही थेट स्वार झालो!

आता ध्येय बदलले होते आणि वेळ कमी होता. तिथले उणे तापमान, वातावरणातील ऑक्सिजनची कमतरता आणि तिथे जाऊन आलेल्यांचे अनुभव ऐकून मनात धाकधूक वाढू लागली होती.

ईबीसीसाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक क्षमता कमावण्यासाठी आमची तयारी आता अधिक जोमाने सुरू झाली. रत्नागिरीतील ‘नारायणमळी’चा कठीण चढाव यासाठी आमची सराव शाळा बनला. तिथे चढ-उतार करताना आम्ही आमचा स्टॅमिना तपासत होतो.

तिकडे सौ. तिच्या महाविद्यालयाच्या आशिया खंडातील एक नामवंत रनिंग ट्रॕकवर सराव वाढवत होती. दररोजचे सराव छायाचित्र समुहावर पडत होते.

मनात येणाऱ्या शंका-कुशंका, लागणारे तांत्रिक साहित्य, कपड्यांचे थर (Layering) यावर कस्तुरीशी आमची सतत चर्चा सुरू असायची. ट्रेकिंगच्या साहित्याची खरेदी हा एक मोठा टास्क होता.

पुण्याच्या ‘डिकॅथलॉन’ (Decathlon) मध्ये जाऊन सर्वांनी एकत्र खरेदी करण्याचे दोनदा नियोजन झाले. पण, काही ना काही कारणाने ते बारगळले.

शेवटी वेळ न दवडता मी आणि सौ.ने कोल्हापूर गाठले. तिथल्या डिकॅथलॉनमध्ये कस्तुरी स्वतः हजर राहिली. तिने आपल्या अनुभवातून आम्हाला योग्य ते साहित्य आणि पोशाख निवडण्यास मदत केली. जे काही शिल्लक राहिले होते, ते आम्ही ऑनलाईन मागवून घेतले. अखेर, बॅगा पॅक झाल्या आणि आम्ही सज्ज झालो.

इकडे गायकवाड साहेबांनीही शासकीय कामानिमित्त मुंबईत गेले असता, तिथल्या डिकॅथलॉनमधून आपल्या ट्रेकचा संपूर्ण बस्ता बांधला.

या अद्भुत प्रवासासाठी आता आम्ही एकूण सातजण एकत्र आलो होतो. अनोळखी चेहरे, पण ध्येय एकच! या सर्वांची एकमेकांशी गट्टी व्हावी, म्हणून १२ मे च्या रात्री आम्ही सर्वजण ‘व्हिडिओ कॉल’द्वारे एकमेकांशी जोडले गेलो.

कस्तुरीने अत्यंत कौशल्याने अंतिम सूचना दिल्या. ‘चेक-इन बॅगेज’मध्ये काय असावे, ‘कॅबीन बॅग’मध्ये कोणत्या वस्तू हव्यात, आपत्कालीन औषधे कोणती, या सर्व गोष्टींची उजळणी झाली. व्हिडिओ कॉल संपला, पण डोळ्यांतील नवखेपण जाऊन तिथे एक अनामिक उत्साह दाटून आला होता.

त्या रात्री डोळे मिटल्यावर सह्याद्रीचे कडे डोळ्यांसमोरुन दूरवर जात होते. एव्हरेस्टच्या पांढऱ्याशुभ्र, नयनरम्य कडा धूसरपणाने जवळ येत होत्या. हिम कणांच्या दुलईत, हिमस्वप्नात रंगून गेलो होतो. आता प्रतीक्षा होती ती फक्त प्रत्यक्ष उड्डाणाची…!

– कुसुमानंद (प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते)
9403464101