हर्णै : दापोली तालुक्यातील हर्णै गावात पंचनाम्यावरून प्रचंड घोळ सुरू आहे. ज्यांना पैसे मिळायला हवे होते त्यांना पैसे मिळाले नाहीत आणि ज्यांचं नुकसान झालं नाही त्यांना १ लाख ६० हजार रूपये मिळालेत. त्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायतीला घेराव घातला. यावेळी कोतवाल यांच्या विरोधात प्रंचड रोष जनतेच्या मनात दिसून येत होता. ग्रामस्थांनी याबद्दल तहसीलदारांकडे तक्रार सुद्धा दाखल केली आहे. त्याची योग्य ती चौकशी करून येत्या पंधरा दिवसात कारवाई करू असं तहसीलदार समीर घारे यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितलं. त्यामुळे हर्णै कोतवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
हर्णै गावातील ग्रामस्थांनी पंचनामा योग्य पद्धतीनं झाला नसल्याची कैफियत तहसीलदारांकडे मागितली. शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी लोकांनी लावून धरली होती. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मदत लवकरात लवकर मिळावी असा सूर सर्वांचा होता. यावर तहसीलदार समीर घारे यांनी आज अभियंता आणि तलाठ्यांची टीम नेऊन पुन्हा एकदा पंचनामा करणार असल्याचं सांगितलं आहे.
हर्णैमध्येच सर्वात जास्त नाराजी आहे. गेल्या ५ दिवसांपासून ग्रामस्थ सतत ग्रामपंचायतीवर येत आहेत. ग्रामपंचायत सदस्या आणि सरपंच यांच्यावरही नाराजी यावेळी लोकांनी बोलून दाखवली. आम्ही तुम्हाला निवडून का दिलं आहे? अन्याय दूर करण्यासाठी की अन्याय करण्यासाठी असा संतप्त सवाल देखील ग्रामस्थ विचारत होते.
हर्णै गावातील काही भागांमध्ये अद्यापही पंचनामा झाला नसल्याच्या तक्रारी देखील यावेळी तहसीलदारांसमोर करण्यात आल्या. त्याची नावं यादीत आहेत त्यांना भरपाई मिळेल पण ज्यांची नावं यादीत नाही आणि त्यांचं नुकसान झालं असेल तर त्यांचा पंचनामा केला जाईल असं तहसीलदार समीर घारे यांनी यावेळी सांगितलं.
सर्व ग्रामस्थांना मदत योग्य प्रकारे मिळेल असं आश्वासन तहसीलदार समीर घारे यांनी दिल्यानंतर लोकं शांत झाली आणि बैठक संपवण्यात आली. त्यांनी वंचित वादळग्रस्तांनी ग्रामपंचायतीमध्ये आपली नावं नोंदवली. आता सर्वांना प्रतीक्षा आहे लवकरात लवकर मदत मिळण्याची.