रायगड : बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या दापोली कृषी महाविद्यालयाच्या कृषी योद्धा रावे गटाच्या वतीने कर्जत तालुक्यातील तमनाथ येथे उपयुक्त आणि अपायकारक कीटकांची ओळख तसेच एकात्मिक कीटक व्यवस्थापन या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

परिसरातील शेतकऱ्यांना पिकांमध्ये आढळणाऱ्या मित्र व शत्रू कीटकांची अचूक ओळख करून देणे, रासायनिक कीटकनाशकांचा संतुलित वापर करणे आणि पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांना लेडीबर्ड बीटल, क्रायसोपा, कोळी आणि परजीवी भुंगे यांसारख्या उपयुक्त कीटकांची सविस्तर माहिती देण्यात आली. हे मित्र कीटक मावा, पांढरी माशी आणि तुडतुडे यांसारख्या अपायकारक कीटकांचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण करून पिकांचे संरक्षण कसे करतात, हे कृषी विद्यार्थ्यांनी समजावून सांगितले.

यासोबतच मावा, पांढरी माशी, खोडकिडा, फळ पोखरणारी अळी, तुडतुडे आणि पान गुंडाळणारी अळी या अपायकारक कीटकांची लक्षणे आणि त्यांच्यामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी एकात्मिक कीटक व्यवस्थापन पद्धतींची माहिती देण्यात आली.

यामध्ये फेरोमोन सापळे, पिवळे व निळे चिकट सापळे, जैविक कीटकनाशके आणि आवश्यकतेनुसार शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या संवादादरम्यान शेतकऱ्यांनी उपयुक्त कीटकांचे संवर्धन, कीटकनाशकांची योग्य निवड आणि फवारणीची वेळ यावर विविध प्रश्न विचारले, ज्यांची विद्यार्थ्यांनी समाधानकारक उत्तरे देत शाश्वत शेतीमधील मित्र कीटकांचे महत्त्व स्पष्ट केले.

तमनाथ गावातील अनेक शेतकऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोहन भोईर, प्रशांत भोईर, माजी सरपंच आरती भोईर आणि रुपेश भोईर यांनी विशेष सहकार्य केले.

तसेच या उपक्रमाला कर्जत प्रादेशिक संशोधन केंद्राचे प्रमुख भरत वाघमोडे, कीटकशास्त्र विभागाचे समिर काळे आणि विस्तार विभागाचे रविंद्र मर्दाने यांचे मार्गदर्शन लाभले. भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीला चालना देण्याचा संकल्प कृषी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.