दापोली : दापोली तालुक्याचे नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी आज सकाळी साखळोली नं. १ शाळेला आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील पॅट चाचणी, शाळा दुरुस्तीचे काम आणि शालेय कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत समाधान व्यक्त केले.

रत्नागिरी प्रज्ञाशोध परीक्षेत दापोली तालुक्याने गुणवत्ता यादीत चमक दाखवली. यामध्ये साखळोली शाळेतील विद्यार्थी ऋग्वेद महेश लोवरे आणि प्रांजल प्रवीण नवरत यांनी प्रज्ञावंत म्हणून आपले स्थान निश्चित केले.

तसेच, बी.डी.एस. परीक्षेत रौप्य पदक मिळवणारी आणि मंथन परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारी तिसरीतील आद्या विनोद गोरीवले आणि सहावीतील सिया महेश देवघरकर यांनी देखील मंथन परीक्षेत यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांचा गटशिक्षणाधिकारी सांगडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय मेहता यांनी प्रास्ताविकात सांगडे यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सांगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दररोज किमान दोन तास अभ्यासाला वेळ देण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला मुख्याध्यापक संजय मेहता, समीर ठसाळ, संजय चोरमले, सुरेश पाटील यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.