गुहागर : आरजीपीपीएलकडे मार्च 2022 नंतर वीज खरेदीदार नसल्याने या प्रकल्पाचे भविष्य अंधारमय आहे. परिणामी 600 स्थानिक कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट ओढवणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारबरोबरच कोकणातील लोकप्रतिनिधी या प्रकल्पाच्या भवितव्यासाठी पुढे येतील, असे मत कंपनीचे कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. महाराष्ट्र शासन अंजनवेल येथील या आरजीपीपीएलकडून वीज खरेदी करत नसल्यामुळे कंपनीसमोर मोठे आव्हान तयार झाले आहे. या प्रकल्पामध्ये गुहागर तालुक्यासह सुमारे 600 स्थानिक कामगार आहेत. हा प्रकल्प बंद पडल्यास त्याचा परिणाम थेट या 600 कुटुंबांवर होणार आहे. याशिवाय वाहन पुरवणारे, बांधकाम करणारे, कॉलनीमध्ये साफसफाई करणारे, असे अनेक ठेकदारांचे व्यवसाय बंद होतील. त्यामुळे त्याची आर्थिक झळ थेट स्थानिकांना बसणार आहे.