रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाने रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल करून चांगलीच चालना दिली आहे. जिल्ह्यात १ लाख ६७ हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली असून, स्थानिक खरेदीवर वाढता भर दिल्याने बाजारपेठेला मोठा फायदा झाला आहे.

पूर्वी चाकरमानी मुंबईहून गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य आणत असत. मात्र, आता गाड्यांमधील गर्दी आणि तिकिटांच्या समस्येमुळे स्थानिक बाजारपेठेतील खरेदीला प्राधान्य मिळत आहे. गणेशमूर्ती, रेडिमेड मखर, सजावटीचे साहित्य, प्रसादासाठी लाडू, पेढे आणि पूजेचे साहित्य यांची खरेदी स्थानिक बाजारातूनच होत आहे. यामुळे २० ते २५ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकांनी दिली.

मूर्ती व्यवसायात १० कोटींची उलाढाल
जिल्ह्यात अडीच ते तीन हजार मूर्तिकार कार्यरत असून, इंधनवाढ आणि साहित्याच्या महागाईमुळे मूर्तींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही मूर्ती व्यवसायातून ८ ते १० कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.

मखर सजावटीला विशेष मागणी
गणेशमूर्तींसोबतच मखराची सजावटही भाविकांसाठी महत्त्वाची आहे. पडदे, झुंबर, विद्युत माळा, कृत्रिम फुलांच्या माळा, तोरणे, मण्यांच्या माळा, रंगीत दिव्यांची तोरणे यांना मोठी मागणी आहे. सजावटीच्या साहित्याच्या खरेदीतून साडेआठ ते नऊ कोटींचा व्यवसाय झाला आहे.

मिठाई व्यवसायात ३०-३५ लाखांची उलाढाल
गणेशोत्सवात मिठाईला मोठी मागणी आहे. पेढे, मोदक, लाडू, चिवडा, फरसाण यांचा खप वाढला आहे. घरोघरी होणाऱ्या आरती, भजनांसाठी तयार जिन्नस मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो. उकडीचे आणि तळलेले मोदक यांना विशेष मागणी आहे. गौरीसाठी करंजी, चकल्या, कडबोळी, शंकरपाळी, अनारसे यांचाही खप वाढला असून, मिठाई व्यवसायातून ३० ते ३५ लाखांची उलाढाल झाली आहे.

फुलांच्या विक्रीत २०-२५ लाखांचा व्यवसाय
कृत्रिम आणि ताज्या फुलांचा वापर मखर सजावटीसह पूजेसाठी होतो. दुर्वा, झेंडू, गुलाब, शेवंती, जरबेरा, डेलिया यांना विशेष मागणी आहे. फुलांच्या माळा, सुटी फुले आणि दुर्वांचे हार यांच्या विक्रीतून २० ते २५ लाखांचा व्यवसाय झाला आहे.

फळविक्रीतही चमक
प्रसादासाठी केळीची पाने, हळदीची पाने, काकडी, चिबूड, नारळ यांना मागणी वाढली आहे. फळविक्रीतून ५ ते ६ लाखांचा व्यवसाय झाला आहे.

पूजा साहित्याची लखलख
धूप, अगरबत्ती, कापूर, वस्त्र, बुक्का, तुपाच्या वाती, ताम्हण, निरंजन, समई, आरतीचे तबक यांच्या खरेदीतून ५ ते ७ लाखांची उलाढाल झाली आहे.

दागिन्यांच्या विक्रीत चमक
सोन्या-चांदीच्या आभूषणांना मागणी आहे. चांदीचे जास्वंदी फूल, मोदक, दुर्वा, हार, त्रिशूळ, मुकूट यांच्यासह इमिटेशन ज्वेलरीलाही पसंती आहे. दागिन्यांच्या विक्रीतून १० ते १५ लाखांचा व्यवसाय झाला.

वाद्यविक्रीतही नाद
ढोलकी, नाल, पखवाज, टाळ, चकवा, मोठे ढोल यांच्या विक्रीतून २.५ ते ३ लाखांचा व्यवसाय झाला आहे. याशिवाय कपड्यांच्या खरेदीतून ५ ते ७ लाखांची उलाढाल झाली आहे.

गणेशोत्सवाने स्थानिक बाजारपेठेला मोठी चालना मिळाली असून, विविध क्षेत्रांतील व्यवसायांनी अर्थचक्राला गती दिली आहे.