हर्णे (दापोली): नॅशनल हायस्कूल हर्णेचे माजी मुख्याध्यापक शराफुद्दीन शेख यांचे आज दुपारी १ वाजता निधन झाले. ते एक महान व्यक्तिमत्व आणि मनमिळावू व्यक्ती म्हणून परिचित होते. कोणत्याही परिस्थितीला हसतमुखाने सामोरे जाण्याची त्यांची खासियत होती.

३२ वर्षे नॅशनल हायस्कूल हर्णे येथे सेवा केल्यानंतर ते ३० जून २०२१ रोजी निवृत्त झाले.

हर्णेच्या बाजार मोहल्ला येथे राहून त्यांनी धार्मिक आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले.

त्यांच्या कार्याचा लाभ केवळ हर्णे गावालाच नव्हे, तर आजूबाजूच्या गावांनाही झाला.

समाजसेवेचे आदर्श उदाहरण ठरलेल्या शराफुद्दीन यांनी जमात-ए-इस्लामीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले आणि समाजातील अनिष्ट प्रथांवर प्रहार केला.

त्यांनी सामूहिक जकात देण्याची पद्धत सुरू केली. तसेच, गावात वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालयाची स्थापना केली.

शराफुद्दीन शेख यांनी भारतीय शिक्षक संघटनेत सक्रिय सहभाग घेतला आणि शाळेतून अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले.

त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अनेक विद्यार्थ्यांना दु:ख अनावर झाले. त्यांनी आपल्या दोन मुलांना डॉक्टर बनवून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

त्यांच्या निधनाने हर्णे गाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे.