मुरुड : जवळील मोरे गावच्या समुद्रात बुधवारी सकाळी मासेमारीची फायबर नौका उलटून पाण्यात पडलेल्या वसंत धर्मा कासारे (वय-३७) यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नेहमी प्रमाणे तिघे करणारे बंधू आपल्या ताब्यातील फायबर बोट घेऊन माच्छारीसाठी समुद्रात गेले होते. मच्छीमारी करत असताना अचानक मोठी लाट आल्यानं त्यांची बोट पलटी झाली.
यावेळी वसंत कासारे यांचे भाऊ सुभाष कासारे आणि सुरेश कासारे यांनी पोहत किनारा गाठल्याने ते वाचले. परंतु दुर्दैवाने वसंत कासारे यांना किनारा गाठता आला नाही. या अपघातात त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
याबाबत मुरूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी वसंत कासारे, सुभाष कासारे आणि सुरेश कासारे हे सख्खे भाऊ फायबरची नौका घेऊन मोरा या भागातील समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. खोल पाण्यामध्ये गेल्यावर उसळत्या लाटांमुळे नौका उलटून हे तिघेजण पाण्यात पडले.
यापैकी सुरेश आणि सुभाष यांनी पोहून किनारा गाठला. यावेळी छोटा भाऊ वसंत यालाही वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु प्रयत्न अयशस्वी ठरले.
वसंत कासारे यांच्या नाका-तोंडात पाणी शिरल्याने ते गुदमरले आणि त्यांचा मृत्यू झाला. हे तिघेही मोरा गावचे रहिवासी आहेत.
मृत वसंत यांच्या देहाचे मुरूड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वसंत कासारे हे विवाहित आहेत. गणेशोत्सवात अशी दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.