दापोली- भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत वाचन मानवंदना कार्यक्रमासह विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
दापोली येथील क्षितिज कला मंच या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शाळेत वाचन मानवंदना कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी क्षितिज कलामंचचे राधेश लिंगायत, दापोली पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
दापोली येथील क्षितिज कला मंच या संस्थेने चंद्रनगर शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘महामानवास वाचन मानवंदना’ हा अभिनव उपक्रम राबविला. शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या पुस्तकाचे प्रकट वाचन केले.
यावेळी क्षितिज कलामंचचे राधेश यांनी संस्थेच्या वतीने शाळेत सर्व विद्यार्थ्यांना पेन व खाऊ सप्रेम भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याशिवाय डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शाळेत वक्तृत्व, निबंधलेखन व रांगोळी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. पद्मन लहांगे यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रातील काही प्रसंग विद्यार्थ्यांसमोर विशद केले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनी क्षितिज कला मंच संस्था व पद्मन लहांगे यांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक मनोज वेदक, बाबू घाडीगावकर, मानसी सावंत आदींनी मेहनत घेतली.