रत्नागिरी : वीज बिल थकबाकीची वसुली करताना सामान्य माणसाना त्रास होता काम नये या भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मागणीला महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

येत्या एप्रिलपासून ‘एक गाव एक दिवस’ अभियान राबवत प्रत्यक्ष ग्रामस्थांशी बोलून त्यांच्या अडचणी दूर करूनच ही वसुली होईल असे आश्वासन कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिले आहे.

लॉकडाऊनमध्ये थकलेल्या वीजबिलाची महावितरणकडून अन्यायकारक वसुली होत असल्याच्या तक्रारी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात येत होत्या.

याची दाखल घेऊन निलेश राणे यांनी देवेंद्र सायनेकर यांच्याशी संपर्क साधला होता तर शुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र सायनेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निलेश राणे यांचे निवेदन त्यांना दिले होते.

यामध्ये वसुली करताना सामान्य नागरिकांना त्रास दिल्यास संघर्षाला तोंड द्यावे लागेल इशारा निलेश राणे यांनी दिला होता. कोकण परिमंडळमध्ये येणाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य लोकांनी अन्यायकारक वीज बिल वसुलीबाबत तक्रारी केल्या आहेत.

कोविड -19 च्या कालावधीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. कोकणातील जनता वीज बिलाच्या थकीत रकमा टप्प्याटप्प्याने भरणा करत आहेत.

मात्र मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून अन्यायकारक पद्धतीने वसुली केली जात आहे, कर्मचारी ती पूर्ण भरण्यासाठी तगादा लावत आहेत. तसेच भरणा केली नाही तर वीज कनेक्शन देखील कापले जात आहे.

त्यामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला असून, कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वसुली करताना सबुरीने घेण्याच्या तसेच टप्प्याटप्प्याने पैसे भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन न तोडण्यासाठी तात्काळ योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी या निवेदनामध्ये केली होती.

या निवेदनाला देवेंद्र सायनेकर यांनी तात्काळ प्रतिसाद देताना अशा कोणत्याही प्रकारची वसुलीची अन्यायकारक पद्धत राबवली जाणार नाही असे आश्वासन दिलेच.

त्याचवेळी येत्या एप्रिल महिन्यापासून ‘एक गाव एक दिवस’ हे अभियान राबवून परिमंडळातील प्रत्येक गावात जाऊन तेथील ग्राहकाच्या तक्रारी, अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यात येतील असेही देवेंद्र सायनेकर यांनी सांगितले.

यावेळी देवेंद्र सायनेकर यांनी निलेश राणे यांच्याशी दूरध्वनीवरून आपली भूमिका स्पष्ट केली तर भाजप उपतालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, उपतालुकाध्यक्ष पिंट्या निवळकर, सहप्रवक्ते नित्यानंद दळवी, मेहताब साखरकर, तालुका चिटणीस ययाती शिवलकर, राहुल भाटकर, अभिजित साळुंखे, रमाकांत आयरे, शिवाजी कारेकर यांच्याशी चर्चा केली.