अस्तान गणातील विकास कामांचे भूमिपूजन

खेड : ‘अस्तान पंचायत समिती गणातील आंबवली गावात जलसंधारण योजनेतून ४० कोटींचे धरण उभारण्यात येणार आहे.

लवकरच या धरणाचा शुभारंभ शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते होईल, असे आश्वासन शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी दिले आहे.

शुक्रवारी, १७ रोजी खेड तालुक्यातील आंबवली विभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन दौऱ्यात ते बोलत होते.

या वेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शंकर कांगणे, अरुण कदम, महेंद्र भोसले, शांताराम म्हैसकर, दर्शना मोरे, शेखर यादव, दिलीप साबळे, वरवली सरपंच स्वप्ना यादव, विजय यादव, शशी मोरे, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौऱ्याच्या सुरुवातीला आंबवली येथील १ कोटी ५० लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर वरवली, सणघर, चाटव, अस्तान, किंजळे तर्फे खेड, कांदोशी, कळमणी, धवडे, बिरमणी अशा सर्व गावातील कामांचा शुभारंभ करण्यात आला.

घरोघरी जाण्याचा संकल्प
‘स्वर्गीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिन असून त्यांनी ८० टक्के समाजकारण करण्याची शिकवण दिली आहे. या माध्यमातून त्यांनी मुंबईसह गावोगावी संघटना वाढवली आणि रुजवली.

प्रत्येक शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या विचाराने वाटचाल करत संघटना वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे. अस्तान गणातील घरोघरी विकास देण्यासाठी आपण कटिबद्ध असून आवश्यक निधी देण्यास बांधील आहे.

परंतु विकास कामे करत असताना संघटना घराघरात वाढली पाहिजे. याकरिता सर्वांनी मिळून संकल्प करुया, असे आवाहनही आमदार योगेश कदम यांनी केले.