दापोली : अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दापोली तालुक्यातील तेजस सुरेश नाचरे याने सीए परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होऊन आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. ही बातमी समजताच पोफळवणे गावातील चिनकटे वाडी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले.
तेजसचे वडील सुरेश नाचरे हे खाजगी कार्यालयात नोकरी करतात, तर आई सुवर्णा नाचरे घरकाम करतात. सर्वसामान्य कुटुंबातील तेजस हा भांडुप येथील छोट्या चाळीत राहतो. अभ्यासातील सातत्य, ध्येयनिश्चिती आणि कष्टाळू वृत्ती यामुळे त्याला हे यश मिळाले. भांडुपमधील अमरकोर शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेताना तो नेहमीच प्रथम तीन क्रमवारीत असायचा. दहावीनंतर काम करीत शिक्षण सुरू ठेवले, तरी अभ्यासात खंड पडू दिला नाही.
नुकताच श्रीराम सामाजिक सेवा मंडळाने भांडुप चाळीत अल्पवेळेत छोटा सत्कार सोहळा आयोजित केला. यशाबाबत विचारले असता तेजस म्हणाला, “आई-वडिलांच्या कष्ट आणि प्रेरणेमुळेच हे यश मिळाले.” अभ्यासू व कष्टाळू तेजसने शाळा, गाव आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले असून सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.

