दापोली : कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या ‘युवा प्रेरणा कट्टा’ने यावर्षी देखील दापोलीत ‘एक राखी जवानांसाठी; देशाच्या रक्षकांसाठी’ हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला.

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवणाऱ्या भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.

या उपक्रमात दापोलीतील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि सामान्य नागरिक असलेल्या महिला भगिनींनी उत्साहाने सहभाग घेत राख्या जमा केल्या.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद पांगारकर, नचिकेत बेहरे, संदीप गरंडे, श्रीप्रीती वैद्य, साक्षी करमरकर, सुमेध करमरकर, रोहन भावे यांच्यासह युवा प्रेरणा कट्टा टीमने अथक परिश्रम घेतले.

या उपक्रमाबाबत बोलताना मिहीर महाजन म्हणाले, “भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०२२ मध्ये या अभियानाची सुरुवात झाली. तेव्हा ७५ हून अधिक शाळा आणि महाविद्यालयांतून राख्या जमा करून सीमेवर पाठवण्यात आल्या होत्या. तेव्हापासून दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला जात आहे.”

यावर्षी जमा झालेल्या राख्या पठाणकोट (पंजाब) येथील भारतीय वायू सेनेच्या हवाई तळावरील जवानांना तसेच मुंबई येथील सशस्त्र सेना सामान चिकित्सा डेपो येथे रवाना करण्यात आल्या.

हा उपक्रम सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या समर्पणाला सलाम करण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे.