दापोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने रविवारी, १० ऑगस्ट २०२५ रोजी दापोली येथील श्री मंगल कार्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांचा भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील उज्ज्वल यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा, परीक्षा आणि उपक्रमांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गौरव या सोहळ्यात होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दापोली शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप जालगांवकर भूषवणार असून, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय गराटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य, जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच शिक्षक पतपेढीचे संचालकही या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धा, इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, नासा-इस्रो भेट स्पर्धा परीक्षा यांमध्ये यश मिळवलेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय, नुकतेच सेवानिवृत्त झालेले प्राथमिक शिक्षक, पंचायत समिती दापोलीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार, आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी पुरस्कार आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही समारंभपूर्वक सन्मान करण्यात येणार आहे.
दापोली तालुक्यातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या भव्य सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप जालगांवकर यांनी केले आहे.