दापोली : भजन कलेला शासकीय सन्मान मिळवून देण्यासाठी, भजनी कलावंतांना शासनाकडून मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि बदलत्या भजनी परंपरेला मूळ स्वरूपात जपण्यासाठी अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याची दापोली तालुका शाखा स्थापन करण्यात आली आहे. या उद्देशाने नुकतीच जालगाव येथील श्रीशैल सभागृहात दापोली तालुक्यातील भजनी कलावंतांची सभा संपन्न झाली.
या सभेला तालुक्यातील भजन मंडळांचे बुवा, पखवाज वादक, चकवा वादक, धरकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजन सम्राट भगवान लोकरे बुवा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या मंडळाच्या दापोली तालुका शाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये रमेश कडू बुवा यांची अध्यक्षपदी, गजानन बेलोसे बुवा यांची कार्याध्यक्षपदी, श्रीधर विचारे बुवा यांची उपाध्यक्षपदी, दिनेश बतावळे यांची सचिवपदी, जीवन गुहागरकर यांची सहसचिवपदी, विनय गोलांबडे यांची खजिनदारपदी, तर मंदार जाधव बुवा आणि विजय भारदे बुवा यांची जिल्हा संपर्क प्रतिनिधी म्हणून एकमताने निवड झाली.
दापोली तालुक्यात भजन परंपरा जपण्यासाठी आणि भजनी कलावंतांना मानधन मिळवून देण्यासाठी अशा प्रकारच्या मंडळाची स्थापना झाल्याबद्दल तालुक्यातील भजन कलावंत आणि भजन रसिक यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.