दापोली: दापोली येथील सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाने 17 ऑक्टोबर रोजी दापोली बस स्थानकामागे एका कारमधून सुमारे 4 किलो 833 ग्रॅम व्हेल माशाची उलटी (अॅम्बरग्रीस) जप्त केली, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी संजय धोपट यांचा समावेश आहे. पोलिस कर्मचाऱ्याचाच या गुन्ह्यात सहभाग असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी काही संशयित दापोलीत येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, अधिकाऱ्यांनी संशयित कारचा पाठलाग करून ती दापोली बस स्थानकामागे थांबवली. कारची झडती घेतल्यानंतर त्यात व्हेल माशाची उलटी आढळून आली. या कारमधील चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे सापडलेल्या मुद्देमालासह त्यांना दापोली येथील सीमाशुल्क कार्यालयात आणण्यात आले.
या प्रकरणी संशयित संजय धोपट (दाभोळ), युवराज मोरे (मुंबई), निलेश साळवी (रत्नागिरी) आणि सिराज शेख (मुंबई) यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी संजय धोपट हे दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने या कारवाईने पोलीस खात्यातही चर्चांना उधाण आले आहे. पोलीस कर्मचारीच अशा गुन्ह्यात सामील असतील तर सामान्यांनी कोणाकडे तक्रार करावी, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
या कारवाईत सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अतुल पोतदार, निरीक्षक प्रतीक अहलावत, रमणिक सिंग, हेड हवालदार सुहास विलणकर, करण मेहता, प्रशांत खोब्रागडे, गौरव मौऱ्या आणि हेमंत वासनिक यांनी सहभाग घेतला. संशयितांना आज (18 ऑक्टोबर) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

