अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘तॉक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा राज्याच्या किनारपट्टीलादेखील बसणार आहे. मुंबई, ठाणे पालघर भागांत यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत सुद्धा प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना घ्यायला सुरूवात केली आहे.

“तॉक्ते” चक्रीवादळ व अतिवृष्टी च्या दरम्यान ग्रामस्थांनी घ्यावयाची काळज

दिनांक 16 ते 17 मे 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्हयाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. सदर कालावधीत वाऱ्याचा वेग खुप जास्त असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

1. मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये अजिबात जावू नये.

2. मच्छिमारांनी आपल्या बोटींचं नुकसान होवू नये म्हणून त्यांना सुरक्षितपणे बांधून ठेवण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

3. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.

4. आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे.

5. घराच्या अवती भवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब रहावे.

6. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे.

7. आपले जवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल), बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.

8. हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.

9. सोबत आवश्यक अन्न धान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.

10. पिण्याचे पाणी शुध्दीकरण करून वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे.

11. अतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्र किनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.

12. ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.

13. सद्यस्थितीत जिल्हयात Home Quarantine असलेले नागरीक व चक्रीवादळाचे पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवतांना एकमेकांत मिसळणर नाहीत याची दक्षता घ्यावी.

14. आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे.

15. कोणाला मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत / तहसीलदार कार्यालय / जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02352-226248, 222233 वर संपर्क साधावा किंवा 7057222233 नंबरवर व्हॉटस्अॅप संपर्क करावे, असं आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केलं आहे.