गतस्मृतींची गजबज- नव्हे, आठवांची गजबज

उपक्रमशील शिक्षक, प्रथितयश साहित्यिक तथा शाहीर राष्ट्रपाल सावंत यांचे नवे पुस्तक ‘गतस्मृतींची गजबज’ आज प्रकाशित होत आहे. चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात अतिशय दिमाखदार समारंभात या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य, संस्कृती, राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या हस्ते होत आहे. या प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून लिहीलेला हा विशेष लेख.
         शून्यातून विश्व निर्माण केलेले म्हणण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण केलेले राष्ट्रपाल सावंत हे एक चारचौघांसारखे मराठी ‘शाळा मास्तर’. मात्र ‘मास्तर’ होईपर्यंत, प्रपंचाचे आणि कारकिर्दीचे बस्तान बसेपर्यंत अनंत यातना, अवमान, हालअपेष्टा सोशीत सोशीत परिस्थितीशी लढलेले, मुकाबला केलेले आणि कधीही हतबल न झालेले ‘लढवय्या’ शूर वीर! त्यामुळेच बेगडी, अलंकारिक किंवा अतिशयोक्तीचा लवलेशही नसलेले त्यांचे लिखाण नेहमीच नैसर्गिक व स्वाभाविक वाटते.
       ‘गतस्मृतींची गजबज’ च्या सुरुवातीलाच राष्ट्रपाल सावंत आवर्जून उल्लेख करतात की, हे पुस्तक म्हणजे आत्मचरित्र नाही. आठवणींचे काही सुटे सुटे तुकडे जोडलेले हे एक निराळेच पुस्तक आहे. कदाचित एखाद्या विशिष्ट साहित्य प्रकारात हे पुस्तक मोडणारही नाही. गतस्मृतींची गजबज हे पुस्तक म्हणजे स्वतः निर्माण केलेल्या पायवाटेने मजेत चालणाऱ्या एका जिंदादिल वाटसरुचा हा कलंदर प्रवास आहे या एकाच वाक्यात या संपूर्ण पुस्तकाचा सारांश सांगता येईल. प्रत्येक माणूस तसे म्हटले तर त्याचे आयुष्य जगत असतो. गतस्मृतींच्या गुंतावळ्यात गुरफटत असतो. मात्र अनेकदा अशा कडू गोड आठवणींना कागदावर लिहीणे अनेकांना शक्य होत नाही. आठवणींचा चक्रव्यूह भेदून जाणे सर्वांनाच जमत नाही. मात्र राष्ट्रपाल सावंत या पुस्तकाच्या माध्यमातून आठवणींच्या कोशातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आहेत असे निश्चितपणे सांगता येईल.
      आत्मनिवेदन करताना फारच संभाळून व जबाबदारीने लिहावे लागते. एखाद्या शब्दाने कोणी कधी कसा दुखावेल सांगता येत नाही.  त्यातही राष्ट्रपाल सावंत पडले एक शाळा मास्तर. या प्राण्याला तर पावलोपावली अशी दक्षता घ्यावी लागते. मात्र संपूर्ण पुस्तक वाचताना असा  एकही ‘दुखरा’ शब्द आढळत नाही हे लेखकाचे फार मोठे कसब आहे. राष्ट्रपाल सावंत जन्मापासूनच अतिशय गरीबीत वाढले. बुद्ध विहारातील भन्तेजींनी त्यांचे नाव ‘राष्ट्रपाल’ ठेवले खरे, पण त्यांच्या बारशाला ना भावकी, नातेवाईक, ना शेजारी पाजारी. त्यामुळेच आयुष्याच्या पहिल्या क्षणापासून गरीबीशी, परिस्थितीशी झगडावे लागलेल्या प्रत्येक घटनेचे, प्रसंगाचे निवेदन साध्या, सोप्या, सहज मात्र निर्मळ शब्दांत मांडण्यात राष्ट्रपाल सावंत कमालीचे यशस्वी झाले आहेत.
       शिक्षकी पेशा संभाळतानाच, आपल्या पेशाशी प्रामाणिक राहून नवनवीन व अभिनव उपक्रम राबविण्यात राष्ट्रपाल सावंत यांचा हातखंडा आहे. त्यातच त्याना लाभलेला पहाडी आवाज ही खरेच दैवी देणगी आहे. अंगभूत आवड असलेल्या साहित्यिक उपक्रमांबरोबरच इतर सामाजिक चळवळींतही लेखक अग्रेसर राहिले आहेत.
       ‘गतस्मृतींची गजबज’ हा खरे तर चार पिढ्यांचा लेखाजोखा आहे. या चारही पिढ्यांचे अतिशय खुमासदार शैलीत त्यांनी वर्णन केले आहे. या तब्बल चार पिढ्यांच्या प्रवासातल्या बऱ्यावाईट आठवणींचा ‘कल्लोळ’ म्हणजे हे पुस्तक आहे. मात्र वाईटातूनही चांगले शोधणारा त्यांचा स्वभाव त्यांचे व्यक्तिमत्त्व, लिखाण अधिक समृद्ध करतो. परिस्थितीने जागोजागी दिलेले चटके विसरून लेखक आयुष्याकडे सकारात्मक भावनेने पाहतो, तसे लिखाण करतो. त्यामुळेच आयुष्यातील अनेक प्रसंग अधिक रंगवून लिहिण्याऐवजी लेखकाने वास्तविक लिखाणास प्राधान्य दिले आहे. आयुष्यात अनेक चढउतार सोडल्यानंतर, सोसताना लेखक स्वतःच्या काही तत्वांशी ठाम राहिला याचे चित्रण पुस्तकातील अनेक प्रकरणांतून दिसते. लेखक धारावीसारख्या झोपडपट्टीत राहून त्याने कधी वाम मार्गाचा अवलंब केला नाही. वेश्यागमन, शिविगाळ, दारु, सिगारेट, चोरी, मारामारी यांसारख्या दुष्कृत्यांपासून लेखक नेहमीच दूर राहिला. या तत्त्वनिष्ठेतून आपणही बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळेच अगदी प्रत्येकाने हे पुस्तक वाचावयास हवे असे मला पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगावेसे वाटते.
        ‘बाळपणीचा काळ सुखाचा’ असे सारेच म्हणतात. मात्र राष्ट्रपाल सावंतांच्या पिढीने किंवा त्यांच्या आधीच्या काही पिढ्यांनी आयुष्यात जे काही सोसलेय ते कधीच ‘सुखावह’ नव्हते. आजची आर्थिक, भौगोलिक आणि शैक्षणिक सुबत्ता पाहता खरे तर आताची पिढी फार भाग्यवान आहे असेच म्हणावे लागेल. कारण वर उल्लेख केलेल्यापैकी काही सोसणे या पिढीच्या वाट्याला आले नाही. मात्र यासाठीच आजच्या पिढीने अशी पुस्तके, आत्मचरित्रे वाचण्याची व समजून घेण्याची खरी गरज आहे. आपल्या मागच्या पिढ्यांनी असा संघर्ष केला नसता, जिद्द दिखविली नसती, संकटांशी किंवा परिस्थितीशी झगडतानाच आयुष्याची अशी घडी बसविली नसती तर आपण आज कुठे असतो याचा आजच्या पिढीस विचार करावयास भाग पाडणारे ‘गतस्मृतींची गजबज’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावयास हवे असे आवर्जून सांगावेसे वाटते.

– बाबू घाडीगांवकर,
जालगांव, दापोली.
मो. ९४२१७९५९५५.

चिपळूण येथील प्रथितयश साहित्यिक, प्रसिद्ध शाहीर तसेच उपक्रमशील शिक्षक असलेल्या राष्ट्रपाल सावंत यांच्या ‘गतस्मृतींची गजबज’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे रविवार दि. १३ एप्रिल २०२५ रोजी चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिंच्या हस्ते समारंभपूर्वक प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त दापोली येथील बाबू घाडीगांवकर यांनी लिहीलेला हा विशेष लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*