रत्नागिरीच्या दापोलीतील साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी आज तिसरी अटक झाली आहे. सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्यानंतर आता मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांना दापोली पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर पारदुले यांना अटकेनंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुधीर पारदुले यांच्या अटकेनंतर किरीट सोमैया यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

दोनच दिवसांपूर्वी ईडीने दापोलीतील तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक केली होती. साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा ठपका देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यापूर्वी प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचं शासनाकडून निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू होती. पदावर असताना अनियमितता आरोपाखाली देशपांडे यांचं निलंबन करण्यात आलं होतं.त्याआधी काही दिवसांपूर्वा रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती. सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेसाठी सदानंद कदम यांनी मोठी ताकद लावल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केल्यांतर उलट सुलट चर्चा झाली होती.