मुश्ताक खान / रत्नागिरी

सध्याच्या अडचणीच्या काळात कोकणवासीयांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या बशीर हजवानी यांचा व्हॉईस ऑफ कोकण, कोकण हेल्पलाईन एसओएस ग्लोबल ग्रुपतर्फे सर्व कोकणी जनतेच्या वतीनं दुबईमध्ये सत्कार करण्यात आला.

निसर्ग चक्रीवादळामुळं कोकणात प्रचंड हानी झाली होती. त्याचबरोबर कोरोनाचा कहर देखील सुरूच आहे. या काळात हजारो लोकांना आधार देण्याचं काम बशीर हजवानी आणि त्यांच्या फाऊंडेशनं केलं आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर तातडीनं गरजूंना अन्न धान्य, खाद्य पदार्थ, मेणबत्ती, जनरेटर, चादरी देण्याचं काम त्यांनी केलं.

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मोजता येणार नाही एवढ्या गावांना त्यांनी मदत केली आहे. मस्जिद, मदरसा, मंदिरं यांना बशीर हजवानी यांनी देणग्या दिल्या आहेत. मदत करताना त्यांनी जात, पात, धर्म काहीही पाहिलं नाही. ज्याच्यावर आपत्ती आली आहे त्याच्यापर्यंत शक्य तेवढी मदत त्यांनी पोहचवली आहे.

कोकणरत्न बशीर हजवानी

बशीर हजवानी यांना प्राईड ऑफ कोकण, रत्न-ए-कोकण, इम्तियाज – ए- कोकण, फक्र-ए-कोकण अशा पुरस्कारांनी यापूर्वी गौरवण्यात आलं आहे. पैसे अनेकांकडे असतात पण दानत फार कमी लोकांमध्ये असते. बशीर हजवानी यांच्या अंगी असलेलं सामाजिक दृष्टिकोन वाखाण्या जोगं आहे. ते कायम कोकणवासीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत.

बशीर हजवानी यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून व्हाईच ऑफ कोकण आणि कोकण हेल्पलाईन एसओएस ग्लोबल ग्रुपनं त्यांचा छोटेखानी सन्मान केला. बशीर हजवानी यांच्या सत्कार प्रसंगी मुनाफ वाडकर, नजीर हुरजूक, मेहमूद बशीर हजवानी, जीब्रान हजवानी, मौलाना तौसिफ अ. हमीद कोंडेकर, मौलाना अशफाक हमदरे आणि नौशाद पटेल उपस्थित होते. बशीर हजवानी यांना आरोग्य लाभो अशी प्रार्थनाही या दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.