बंड्या शिर्के यांची मनसेत पुनरागमनाची शक्यता, वैभव खेडेकर यांच्या भूमिकेकडे रत्नागिरीच्या राजकारणाचे लक्ष

दापोली: संतोष उर्फ बंड्या शिर्के यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) पुनरागमनाची चर्चा रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

शुक्रवारी ते रत्नागिरी जिल्ह्यातील निवडक मनसे पदाधिकाऱ्यांसह मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरे यांच्या बंगल्यावर भेटीसाठी जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.

बंड्या शिर्के यांनी यापूर्वी मनसेत सक्रिय सहभाग घेतला असून, ते मनसेचे जिल्हाध्यक्षही होते. मनसे स्थापनेनंतर पहिल्या शिलेदारांपैकी एक म्हणून त्यांचे नाव गणले जाते.

त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूकही लढवली होती.

मात्र, काही काळ शिवसेना आणि नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा ते मनसेत दाखल होण्याची शक्यता आहे.

बंड्या शिर्के यांच्या मनसेतील प्रवेशामुळे पक्षाला रत्नागिरी जिल्ह्यात नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात दापोली नगरपंचायतीत मनसेने तीन नगरसेवक निवडून आणले होते. मात्र, त्यानंतर पक्षाला असं यश मिळवता आलं नाही.

आता शिर्के यांच्या पुनरागमनाने मनसेला पुन्हा बळ मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि स्थानिक पातळीवरील प्रभावाचा पक्षाला फायदा होईल, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

दरम्यान, मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या भूमिकेकडेही रत्नागिरीच्या राजकारणाचं लक्ष लागलं आहे.

अलीकडेच एका धार्मिक कार्यक्रमात खेडेकर यांनी शिवसेना नेते रामदास कदम, उदय सामंत आणि योगेश कदम यांच्यासोबत हजेरी लावली होती.

या भेटीत शिवसेना नेत्यांनी खेडेकर यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे.

यानंतर मनसेत खळबळ उडाली. खेडेकर यांनी शिफारस केलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी तात्काळ स्थगिती दिली.

यामध्ये जुनैद बंदरकर (उपजिल्हाध्यक्ष, राजापूर विधानसभा), अरविंद मालाडकर (उपजिल्हाध्यक्ष, रत्नागिरी विधानसभा), सचिन शिंदे (तालुकाध्यक्ष, रत्नागिरी), मिलिंद भाटकर (शहर अध्यक्ष, रत्नागिरी), संदेश साळवी (तालुकाध्यक्ष, चिपळूण) आणि राजेंद्र गांजरे (शहर अध्यक्ष, चिपळूण) यांचा समावेश आहे. या नियुक्त्या मनसे नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांच्या सहीने रद्द करण्यात आल्या.

या घडामोडींमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. वैभव खेडेकर हे मनसेत राहतील की दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेने जिल्ह्यात चांगली कामगिरी केली होती, परंतु या नियुक्त्या रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

बंड्या शिर्के यांच्या पुनरागमनामुळे मनसेला नवं बळ मिळेल की खेडेकर यांच्या भूमिकेमुळे पक्षाला फटका बसेल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*