रत्नागिरी : तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडी येथे आषाढी एकादशीच्या औचित्याने भक्तीमय वातावरणात आषाढी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.
यावर्षीच्या दिंडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक उत्सवाची सांगड केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता या सामाजिक अभियानाशी घालण्यात आली होती.
सकाळी शाळेच्या आवारातून विठू माऊलीच्या जयघोषात आणि ज्ञानोबा-तुकाराम च्या गजरात निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी, हातात टाळ-मृदंग घेऊन अभंग गाणारे विद्यार्थी आणि विठ्ठल-रुक्मिणीसह इतर संतांच्या वेशातील बालरुपांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

श्री चव्हाटेश्वर मंदिर ते प्राथमिक शाळा या मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा – वसा घेतला साक्षरतेचा, अबीर गुलाल उधळीत रंग – नवभारत साक्षर करण्यात आम्ही दंग अशा विविध घोषवाक्यांचे फलक हातात धरून साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले.
ग्रामस्थांनी ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत केले. या प्रसंगी पालक व विद्यार्थ्यांनी अभंग, फुगडी आणि रिंगण धरत सोहळ्याचा उत्साह वाढवला. या उपक्रमाचे नियोजन गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार आणि केंद्रप्रमुख मिनाक्षी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक माधव अंकलगे व शिक्षिका पुनम कुलकर्णी यांनी केले.

सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शाळा विकास समिती आणि माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता कुर्टे, व्यवस्थापन समिती सदस्य उदय रहाटे, अंगणवाडी सेविका सुजाता लोहार, अंगणवाडी मदतनीस समीक्षा घवाळी, तसेच रिया तांबटकर, रुणाली तांबटकर, वेदिका धनावडे, समीक्षा तांबटकर, नुतन रहाटे, मानवी तांबटकर, वेदा कुर्टे, दिव्यता तांबटकर, अश्विनी कुर्टे यांच्यासह पालक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. भक्ती आणि सामाजिक कर्तव्याची सांगड घालणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

