दापोली: दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सडवे क्र. १ चा अमृत महोत्सव आणि स्नेहसंमेलन, सरपंच वसंत मेंगे यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडले.
गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून या सोहळ्याचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला उपसरपंच राजेश भेकरे, ग्रामाध्यक्ष प्रकाश मेंगे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश मेंगे, उपाध्यक्ष अजित वाडकर, तंटामुक्त अध्यक्ष महेश पाडद, माजी तंटामुक्त अध्यक्ष जयेंद्र कावणकर, पोलीस पाटील रोशन पाडद, अंगणवाडी सेविका मनाली वाळंज, साक्षी भेकरे, आशा सेविका ज्योती वाडकर, गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक शामराव वरेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली.
सूत्रसंचालन शिक्षिका नेहा उकसकर आणि शाळेच्या माजी शिक्षिका, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मंगल सणस यांनी केले.
दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात, शाळेला १२ गुंठे जमीन विनामोबदला देणारे दिवंगत महादेव सोनू कावणकर (बाबा कावणकर) यांचे सुपुत्र सुरेश आणि सुरेश कावणकर यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली.
त्यानंतर महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन झाले आणि रात्री भोजनानंतर शाळेतील सर्व माजी शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
तसेच अनेक माजी विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. “ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा” या उक्तीप्रमाणे अनेकांनी शाळेविषयी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
अमृत महोत्सवासाठी मिशन आपुलकी अंतर्गत ग्रामस्थांनी सुमारे दीड लाख रुपयांचा शैक्षणिक मदतीचा निधी आणि वस्तू शाळेला दिल्या.
तसेच, माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गामध्ये पंखे आणि वॉलपेपर भेट दिले. रात्री मुलांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला, ज्यात प्लास्टिक बंदी, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण आणि पाण्याचा योग्य वापर यांसारख्या विषयांवर समाजप्रबोधनपर कीर्तन सादर केले.
या कार्यक्रमाला अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि कार्यक्रमाचा आनंद घेतला.
अमृत महोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व वाडीप्रमुख, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सचिव आणि महिला मंडळाने विशेष सहकार्य केले, त्याबद्दल शिक्षक विकास पटले यांनी सर्वांचे आभार मानले.