दापोली : इंडियन सोसायटी ऑफ ऍग्रीकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च, नोएडा – उत्तर प्रदेश या सोसायटीच्या कार्यकारी समितीकडून अमित बैकर यांना प्रतिष्ठित “सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार कृषी आणि संबंधित विज्ञानातील वर्तमान नवकल्पना आणि तांत्रिक प्रगतीवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये बहाल करण्यात आला.
गुरु काशी युनिव्हर्सिटी, तळवंडी साबो (ICAR ऍक्रेडीटेड) आणि जस्ट ऍग्रीकल्चर ग्रुप व ISASTR नोएडा यांच्या संयुक्त विद्यमाने ही आंतरराष्ट्रीय परिषद गुरु काशी युनिव्हर्सिटी, तळवंडी साबो येथे यशस्वीरित्या पार पडली.
डॉ. पी.के. सिंग (कृषी आयुक्त, भारत सरकार) हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. विविध ११ देशांतील एक हजार पेक्षा अधिक संशोधन अभ्यासक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
अमित बैकर हे दापोली तालुक्यातील देवके गावचे रहिवासी असून त्यांनी कृषी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केलं आहे.
त्यांना या वर्षीचा सायंटिस्ट ऑफ द यिअर – २०२४ पुरस्कार, तरुण व्यावसायिक पुरस्कार व डॉ. एच.एस. पृथी पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी विविध आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये गौरवण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध जर्नलमध्ये त्यांचे कृषी क्षेत्रासंबंधी अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.
लहानपणापासून शिक्षणात गोडी असलेल्या अमित बैकर यांचं महाविद्यालयीन शिक्षण हे डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे झालं आहे.
२०१५ साली त्यांनी कृषी कीटकशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. सध्या ते युपीएल लिमिटेड, मुंबई या नामांकित कृषी कंपनीमध्ये संशोधन नियामक व विकास या विभागामध्ये कार्यरत आहेत.
त्यांच्या या यशामागे त्यांचे आई-वडील, पत्नी व प्राध्यापकवृंद यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने दापोली तालुक्याचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर झळकले आहे. सर्व स्तरातून त्यांचं कौतूक होत आहे.