रत्नागिरी : जिल्ह्यातील कराेना रुग्णांची संख्या वाढत आहे,या पार्श्वभूमीवर आज नामदार उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या मध्ये सर्वांनी एकजुटीने करोना विरोधाच्या लढ्यात उतरण्याचे मान्य करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल नामदार उदय सामंत यांनी सर्वपक्षीयाचे आभार मानले आहेत.

शआज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार राजन साळवी, माजी आमदार बाळासाहेब माने, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, नवनिर्माणसेनेचे वैभव खेडेकर, जितेंद्र चव्हाण, काँग्रेसचे रमेश कीर, शिवसेनेचे सचिन कदम, राष्ट्रवादीचे बाबाजी जाधव, बशीर मुर्तुजा यांच्यासह अन्य सर्वपक्षीय मंडळी उपस्थित होती.

यावेळी सर्वांनी रत्नागिरी जिल्ह्यातील करोना विरूद्धच्या लढ्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. रत्नागिरी महिला रुग्णालयात १६० ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार आहेत.

त्यासाठी पॅरामेडिकल स्टाफ लागणार असून माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या यश फाऊंडेशन नर्सिंग कॉलेजमधील ४०विद्यार्थिनी महिला रुग्णालयात काम करणार असून त्यांना आता लगेच ट्रेनिंग देण्यात येणार आहे अशी माहिती ना. सामंत यांनी यावेळी दिली, तसेच जिल्ह्य़ातील खेड दापोली आदी नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांची देखील मदत घेतली जाणार आहे.

परकार नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थी महिला हॉस्पिटल येथे काम करणार आहेत तर वालावलकर रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ त्या रुग्णालयासाठी काम करणार आहेत, वालावलकर रुग्णालयातील दहा डॉक्टराची प्रशासन मदत या कराेना लढ्यासाठी घेणार आहे.

त्यासाठी प्रशासनाने त्यांचे मानधन पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे असे ना. उदय सामंत म्हणाले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली. जिल्ह्यातील कोरोना विरोधातील लढाईत आता बळ मिळेल हे नक्की.