दापोली : दापोलीतील सुप्रसिद्ध विकासक आणि जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय फाटक यांची भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.
सुमारे पाऊणे दोन वर्षांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यानंतर युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून सक्रिय भूमिका बजावत होते.
ही नवीन जबाबदारी त्यांच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची ठरली असून, त्यांनी ती एक मोठे कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून स्वीकारली आहे.
अक्षय फाटक यांनी सांगितले की, या पदाला हक्क किंवा अधिकारांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला अधिक मजबूत करण्यासाठी आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या जबाबदारी सांभाळताना ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, याबाबत त्यांना पूर्ण खात्री आहे.
या नियुक्तीमागे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचे आशीर्वाद, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांचा विश्वास तसेच माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी आमदार विनय नातू आणि माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे.
अक्षय फाटक यांच्या नेतृत्वात रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे कार्य अधिक गतीमान होईल, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.