खेड : मालवाहू रिक्षा टेम्पोला दुचाकीची धडक बसल्याने युवकाचा जागीच मृत्यू होण्याची घटना रविवारी सायंकाळी कुंभाड पुलाजवळ घडली.

अंकीत तांबे  ( वय  – 23 , रा. कुंभाड  ) असे मयत युवकाचे नाव आहे. तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे.

मयत अंकीत तांबे हा आपल्या दुचाकीवरून कुंभाड ते खोपी असा मित्राला घेऊन यामाहा एफ झेड गाडीने भरधाव जात होता.

त्याच दरम्यान खोपीकडून कुंभाडकडे जाणाऱ्या मालवाहू रिक्षा टेम्पोला कुंभाड पुलाजवळ दुचाकीची जोरदार धडक बसली.  ही धडक एवढी जोरात होती की, अंकीत तांबे याचा जागीच मृत्यू झाला.

त्याच्यासोबत असणारा अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातानंतर खेडच्या मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, दिनेश जाधव आणि इतर सहकारी यांनी मदत करुन सहकार्य केले होते.

या वेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.