खेड – ‘शादी डॉट कॉम’ च्या संकेत स्थळावरुन सुंदर मुलींचे फोटो वापरुन संपर्क झालेल्या तरुण तरुणींना फसवणारी जोडी खेड पोलिसांच्या हाती आली आहे.

याप्रकरणातील महिलेला पोलादपूर येथून मुंबईला पळून जाताना अटक केली असून दोघांनाही येथील न्यायालयासमोर हजर केले असता २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

‘शादी डॉट कॉम’ या लग्न जुळवणाऱ्या संकेत स्थळावर ओळख काढून खेडमधील एका विधूराची ७७ हजारांना फसवणूक केली होती.

या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर ठाणे येथून मनोज छोटूराम योगी या मुळ राजस्थान येथील इसमाला अटक केली होती.

त्याच्या कडून दोन मोबाईल आणि कार जप्त केली होती. फसवणूकीचा तपास सुरु असताना रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील देवळे येथील महिलेच्या बॅंक खात्यात फसवणूकीची रक्कम जमा केली जात असे.

ही महिला तपासाकरिता आवश्यक असताना ती गणेशोत्सवासाठी गावी गेल्याचे पोलीसांना समजले होते. तेथे संपर्क केल्यावर एसटी बसने ठाणे येथे पळून जाणार होती.

पोलिसांनी तिला लोहारमाळ येथून ताब्यात घेतले. त्यानंतर तिची रवानगी खेड पोलीस ठाण्यात केल्यावर प्राथमिक तपास केल्यानंतर दोघांनी ७७ हजार आणि आणखी काही जणांना फसवले असल्याचे कबूल केले.

त्यानंतर मनोज योगीसह ३० वर्षीय महिलेला न्यायालयात हजर केले. तेव्हा दोघांना २७ सप्टेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तरुण तरुणींसह विधूरांना फसवून लाखोंची रक्कम जोडगोळीने काढलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची तपासणी खेड येथील पोलीस करीत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर करीत आहेत.