रत्नागिरी : आज दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी रत्नागिरीतील भारतीय तटरक्षक दलातर्फे रत्नागिरी शहरा शेजारील कुर्ली समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आलं.

आजच्या दिवशी जगभरात सागरी वनस्पती व प्राणी यांचे संरक्षण करणे आणि सागरी पर्यावरणाचे रक्षण करणे यासाठी स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्र यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिन-2023 पाळण्यात येतो.

दरवर्षप्रमाणे याही वर्षी, भारतीय तटरक्षक रत्नागिरीने आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनानिमित्त रत्नागिरी शहराजवळील कुर्ली समुद्रकिनारी सकाळी 0730 ते 0900 या वेळेत तटीय स्वच्छता मोहीम आयोजित केली.

ही मोहिम मत्स्यव्यवसाय विभाग, एनसीसी कॅडेट्स, सागर सीमा मंचचे स्वयंसेवक आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने यशस्वी झाली.

स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रासाठी पर्यावरण संवर्धनाच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन कुर्ली गावच्या सरपंच राधिका साळवी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कार्यकारी अधिकारी समादेशक दिनेश टामटा, इतर अधिकारी, सागर सीमा मंचच्या अधिवक्ता ऐश्वर्या विचारे, कुर्ली गावचे राजन तोडणकर इत्यादी प्रमुख मान्यवर सहभागी झाले होते.

या उपक्रमात मत्स्यव्यवसाय विभागाचे तेवीस कर्मचारी, वीस एनसीसी कॅडेट्स, ग्रामस्थ व तटरक्षक दलाचे जवान असे सुमारे 125 स्वयंसेवक सहभागी झाले होते.

खबरदारी म्हणून कार्यक्रमादरम्यान तटरक्षक दलाने लाइफ गार्ड/ गोताखोरांना समुद्राच्या बाजूने नियुक्त केले.

कार्यक्रमादरम्यान पुनर्वापर करता येण्याजोगा प्लास्टिक कचऱ्यासह एकूण 80 किलो कचरा गोळा करण्यात आला.

बायोडिग्रेडेबल कचरा आणि इतर पुनर्वापर करता येण्याजोगे प्लास्टिक स्वतंत्रपणे गॅश बॅगमध्ये गोळा केले गेले.

संकलित केलेला कचरा पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी गाव प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला.