लॉकडाऊनच्या काळात विनापरवानगी परराज्यातून ३२ कामगारांना आणल्या प्रकरणी लोटे येथील पुष्कर पेट्रोकेम कंपनीचे मालक गौतम मखारिया, व्यवस्थापक प्रभाकर आंब्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटेचे सरपंच सचिन सुभाष चाळके यांच्या तक्रारी नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव जिल्ह्यामधून संपुष्टात यावा यासाठी ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरू केली होती. याकाळात लॉकडाऊन पाळण्याचे आदेश देण्यात आले होते. पण पुष्कर पेट्रोकेमचे मालक गौतम मखारिया आणि व्यवस्थापक प्रभाकर आंब्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉकडाऊनच्या आदेशीची पायमल्ली केली. आपल्या कृतीमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो याची जाणीव असून देखील त्यांनी विनापरवानगी ३२ कामगारांना परराज्यातून आणलं. याच प्रकरणी त्यांच्यावर खेड पोलीसांनी गुन्हा दाखल गेला आहे.

दोन्ही संशयीत आरोपींवर भा.दं.वि.क २६९, २७०, १८८, ३४, नैसर्गिक आपत्ती कायदा २००५चे ५१(ब), साथ रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७चे कलम २,३ आणि महाराष्ट्र कोव्हीड-१९च्या उपाययोजना नियम २०२०चे नियम ११ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अरोपींना रात्री उशीरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. या प्रकरणाचा तपास खेड पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडे आहे.