दापोली : दापोलीतील सुप्रसिद्ध सर्जन आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रशांत मेहता यांचं पुण्यामध्ये उपचार घेत असताना निधन झालं आहे. ते जहांगीर रूग्णालयमध्ये उपचार घेत होते. त्यांचं वय 65 वर्ष होतं.

त्यांच्या जाण्याने दापोलीतील सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे

गेल्या काही महिन्यांपासून ते कर्क रोगाशी लढत होते. डॉ. प्रशांत मेहता लढवय्ये होते. या आजाराशी त्यांनी न खचता संयतपणे सामना केला. पण नियतीला काही वेगळच मंजूर होतं.

काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पुणे येथील जहांगीर रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांची प्रकृती खालावत गेली. आणि आज दिनांक 08 जून 2022 रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली.

डॉ. प्रशांत मेहता दापोलीतील नामवंत सर्जन होते. त्यांचबरोबर ते सामाजिक क्षेत्रातही सक्रिय होते. दापोली अर्बन बँकेचे ते अनेक वर्ष संचालक होते. दापोली लायन्स क्लब उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. जॉली क्लबचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते.

त्यांच्या जाण्यानं अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. माय कोकणचे संपादक मुश्ताक खान यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.