आरवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात पोटठेकेदार म्हणून स्थानिक आमदार किंवा अन्य राजकीय नेत्याला काम देऊ नये, अशी सूचना भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.

गेली पाच वर्षे मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मूळ ठेकेदारांकडून स्थानिक आमदार किंवा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना दबावाचा वापर करून लोकप्रतिनिधी जबदस्तीने कामे मिळवून देतात. केवळ राजकीय आशीर्वाद असल्याने विहित वेळेत पोटठेकेदार काम पूर्ण करत नाहीत. तसेच मूळ ठेकेदारही या संदर्भात काहीच बोलू शकत नाही आणि विचारणा किंवा चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यास हे कार्यकर्ते आपल्या स्टाईलने ठेकेदाराला दम देतात. या महामार्गाचे काम जर लवकर पूर्ण करायचे असेल तर मूळ ठेकेदारालाच काम करू दे. अन्य राजकीय पक्षाच्या कोणालाही पोटठेकेदार म्हणून नेमण्यात येऊ नये, अशी सूचना शेकासन यांनी केली आहे.

नुकतेच महाविक आघाडीने केलेले आंदोलन म्हणजे नौटंकी होती. राज्यात महाविकास आघाडीचे शासन असताना राज्य आणि जिल्हा मार्गाची झालेली दुरवस्था याला जबाबदार कोण, असा सवाल करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य आणि जिल्हा मार्ग दुरुस्तीसाठीही आंदोलन करावे, असे भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी सांगितले.