रत्नागिरी – दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे संक्रांतीच्या दिवशी तीन वयोवृद्ध महिलांचा मृत्यू हा जळून झालेला नसून त्यांचा दागिन्यांच्या हव्यासापोटी अज्ञाताने त्यांचा खून केल्याचे आता पोलीस तपासात पुढे आले आहे. या घटनेमुळे दापोली तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. तर तालुक्यातील वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याच घरात खून झाल्याचा संशय आहे

दापोली पोलिसांनी याबाबत चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. तीन महिलांच्या अंगावरील 1 लाख 62 हजार 150 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेल्याचे पोलीस स्थानकात नोंद झालेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे व रुक्मिणी पाटणे यांच्या डोक्यात प्रहार करून नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद हे करत आहेत.

दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरातील तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेने अवघा दापोली तालुका हादरून गेला आहे.

दापोली पालगड रोडवरील वणोशी या गावांमध्ये खोतवाडी आहे. या वाडीमध्ये सुमारे 25 घरे आहेत. यातील बहुतांशी घरे ही बंद अवस्थेत आहेत.

वाडीतील बहुतांश ग्रामस्थ हे काम-धंद्यानिमित्त मुंबई येथे स्थलांतरित झालेले आहेत. सद्यस्थितीत गावात केवळ चार ते पाच कुटुंबेच वास्तव्याला आहेत. गावातच खोतवाडी येथे एका घरामध्ये सत्यवती पाटणे (वय 75) तसेच पार्वती पाटणे (90) व रुक्मिणी पाटणे या वृद्ध महिला राहत होत्या. त्यांच्या समोरच्या घरात त्यांच्याच नातेवाईक असलेल्या इंदुबाई पाटणे (85) या राहायला होत्या.

सध्या दापोलीत थंडीचे दिवस असल्याने त्या घरांची दारे खिडक्या बंद करून राहत असतं. मात्र, दररोज सकाळी त्या उन्हामध्ये बसत असतं. त्यांच्या घरासमोरील मंदिरात पूजा करण्याकरिता विनायक पाटणे हे दररोज सकाळी येतात. त्यांना शुक्रवारी सकाळी या महिला नेहमीप्रमाणे बाहेर उन्हामध्ये बसलेल्या दिसल्या नाहीत.

शिवाय त्यांना मंदिराची किल्ली देखील हवी होती. यासाठी ते किल्ली मागण्यांकरिता या महिलांच्या घरामध्ये गेले. मात्र, आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा ढकलून पाहिला असता तो त्यांना उघडा असलेला आढळला. त्यांनी आतमध्ये पाहिले असता त्यांना या वृद्ध महिला मृतावस्थेत आढळून आल्या.

दरम्यान, विनायक पाटणे ही बाब ग्रामस्थांना सांगितली ग्रामस्थांना सांगितल्यावर ग्रामस्थांनी येऊन खातरजमा केली असता घरामध्ये तीन खोल्यांमध्ये तीन महिला मृतावस्थेत आढळून आल्या होत्या.