रत्नागिरी – ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भिसे हे तत्त्वनिष्ठ पत्रकार होते. पत्रकारितेबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. पत्रकारितेतील तत्वे जपत त्यांनी आयुष्यभर पत्रकारितेला जोपासण्याबरोबर ती भक्कम करण्याचे तत्त्व स्वीकारले.
अखेरच्या क्षणापर्यंत ते निर्भिड पत्रकार म्हणूनच ते जगले. त्यांच्या निधनामुळे खर्या अर्थाने रत्नागिरीतील नव्हे तर संपूर्ण कोकणातील पत्रकारितेचे फार मोठे नुकसान झाले आहे, असे प्रतिपादन दैनिक एक्सप्रेसचे संपादक रमेश कीर यांनी केले.
साप्ताहिक आरसाचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भिसे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रत्नागिरीतील सर्व पत्रकारांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कीर बोलत होते.
बाळासाहेब भिसे हे मनमोकळे व्यक्तीमत्व होते. जेवढे शिस्तप्रिय तेवढेच नम्रही होते. पत्रकारितेबरोबरच त्यांचे अनेक पैलू होते. अभ्यासू पत्रकार घडविण्याबरोबरच राजकारणातील शिवसेनेची मुहूर्तमेढ बाळासाहेबांनीच रत्नागिरीत रोवली होती.
सत्तरीच्या दशकात बाळासाहेब भिसे साप्ताहिक आरसाचे संपादक म्हणून त्यांचा सर्व क्षेत्रात दबदबा होता. साप्ताहिक आरसामध्ये आपल्याबद्दल काय छापून येणार याची उत्सुकता राजकारणाला असे. जो चुकला त्याला आपल्या लेखणीच्या माध्यमातून झोडण्याची धमक त्या काळात बाळासाहेबांमध्ये होती.
ती त्यांनी अखेरपर्यंत जपली होती. पत्रकारिता नेहमी सर्वसामान्य गरीब, शोषित, पीडितांना न्याय देण्यासाठी असते. पत्रकारितेतून या घटकांना न्याय कसा मिळेल हे पत्रकारांकडून बाळासाहेब भिसे मांडत असत, असे कीर यांनी सांगितले.
साप्ताहिकाचे संपादक असतानाही आपल्या मित्रपरिवाराला सोबत घेत त्यांनाही आपल्या साप्ताहिकातून लिखाण करण्याची संधी बाळासाहेबांना दिली.
त्यातून अनेक लेखक तयार झाले. साप्ताहिक आरसाला आरशासारखी ओळख निर्माण करून देण्याचे काम बाळासाहेब भिसे यांनी केले. दैनिक रत्नागिरी एक्सप्रेसचे संपादक म्हणून काम करताना त्यांनी तीच तत्त्वे पाळली होती. दैनिक एक्सप्रेसमधून त्यांनी अनेक नवे पत्रकार घडवले.
आक्रमक पत्रकार म्हणून त्यांची ओळख आपल्यापर्यंत कायम होती. थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधणार्या बाळासाहेब भिसे यांनी शिवसेनेची पहिली शाखा रत्नागिरीत सुरू करून शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली होती. आक्रमक राजकीय संघटना असलेल्या शिवसेनेला बाळासाहेबांच्या आक्रमकतेचा त्या काळात मोठा फायदा झाला.
बाळासाहेब सभांच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टींसह जनतेला हव्या असलेल्या विषयांवर आपल्या खास शैलीत विवेचन करीत असत. ते त्या काळात जनतेला भावले. त्यातून शिवसेना येथे भक्कम होत गेली. आज असा आक्रमक पत्रकार आपल्यातून निघून गेल्याने त्याचा मोठा तोटा रत्नागिरीतील पत्रकारितेला होणार असल्याचे कीर यांनी सांगितले.
शोकसभेच्या सुरूवातीला बाळासाहेब भिसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर माय कोकणचे संपादक मुश्ताक खान, पत्रकार श्रीकृष्ण देवरूखकर, पत्रकार राजेंद्र चव्हाण यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
त्यानंतर संपादक कीर यांनी आपल्या मनोगतात बाळासाहेब भिसे यांच्या कारकिर्दीचा आलेख पत्रकारांसमोर मांडला.
यावेळी शोकसभेला पत्रकार सर्वश्री प्रशांत उर्फ पिंट्या पवार, जमीर खलफे, सचिन बोरकर, आनंद तापेकर, सिद्धेश मराठे, मकरंद पटवर्धन, राजेश चव्हाण, राजेश कळंबटे, अनघा निकम आदी उपस्थित होते.