दापोली : तालुक्यातील जालगाव येथील विद्यानगरमध्ये राहणारे आणि पेशानं शिक्षक असलेले सचिन खटावकर यांच्या घरातून सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत.
या प्रकरणी त्यांनी अज्ञाता विरोधात दापोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्तानं 18/11/2021 रोजी रात्री 08.00 ते आपल्या कुटुंबीयांसोबत दापोली येथील महापुरुष मंदिरामध्ये दर्शनला गेले होते. या काळात आपल्या घराला कुलूप लावून ते चावी सोबत घेऊन गेले होते.
देवदर्शन झाल्यानंतर ते रात्री 09.30च्या सुमारास घरी परतले. त्यावेळी शेजाऱ्यांनी तुमच्या घराजवळ कुणी तरी येऊन गेल्याचं सांगितलं. त्यांनी फोन तापासून कोणाचा फोन आला होता का? हे पहिलं.
पण तसं काही त्यांना दोघांच्या फोनवर दिसलं नाही. चौकशी करून पाहतो असं शेजाऱ्यांना सांगून खटावकर कुटुंबीय आपल्या घरात गेले.
सचिन खटावकर यांच्या पत्नी हातातल्या बांगड्या बेडरूममधील ठेवण्या करीता गेल्या. पण त्यांना दागिन्यांची स्टीलची पेटी कुठे आढळली नाही.
घरात शोध घेतल्यानंतर कपाटातील दागिन्यांची पेटीच चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
कुणी तरी अज्ञात चोरट्यानं बनावट चावीच्या सहाय्यानं घरातील कुलूप उघडून चोरी केल्याबद्दल त्यांची खात्री पटली.
त्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून चोरी झाल्यची रीतसर तक्रार नोंदवली.
यामध्ये मंगळसूत्र, सोन्याचा हार व पेंडेंट, सोन्याची चैन, लेडीज ब्रेसलेट, कानातील सोन्याचे झुमके, कानातील सोन्याच्या रिंगा, अंगठी आदी सुमारे 5 लाख 57 हजार 500 रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
दापोली पोलीसांनी या चोरी प्रकरणी भा. दं. वि. कलम 457, 380 नुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दापोली पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.