रत्नागिरी : दुसरी लाट कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, उपहारगृहे आणि दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मूभा प्रशासनानं स्वातंत्र्यदिनापासून दिली आहे.

राज्यात कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे साथरोग कायदा, 1897 ची अंमलबजावणी सुरु आहे. ज्याअर्थी, राज्यात कोव्हिड 19 साथरोगामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरु आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक 15/08/2021 रोजी पासून ते शासनाकडील पुढील आदेश होईपर्यंत खालील प्रमाणे निर्देश पारीत करणेत येत आहेत.

खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने खालील अटीच्या पुर्ततेच्या अधीन राहून सुरू करण्याची मुभा देण्यात येत आहे.

अ) उपहारगृह / बारमध्ये प्रवेशकरताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील व याबाबतच्या स्पष्ट सुचना उपहारगृह आस्थापनानी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील.

ब) उपहारगृह / बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचा-यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहे. असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह / बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.

क) वातानुकूलित उपहारगृह / बार असल्यास, वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल.

ड) प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहील.

इ) उपहारगृह / बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी.

फ) उपहारगृह / बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहील.

उपहारगृहे/बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह / बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री 09.00 वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

त्याचबरोबर जिल्हयातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.