दापोली : शहरातील केळसकर नाक्या जवळ असलेल्या दाभोळ रोडवर दोन किलो पेक्षा जास्त गांजा पोलीसांनी पकडला आहे. या घटनेमुळे दापोली परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

बुधवारी ११ ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी ही करवाई केली गेली. या गुन्ह्यात कोकंबाआळी इथं राहणाऱ्या 54 वर्षीय मकसूद जाफर पावसकर आणि मच्छीमार्केट भागात राहणाऱ्या 20 वर्षीय साहिल अकबर पठाण या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण ३ लाख ६९ हजार ६८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ४२ हजार ६८० रुपयांचा २ किलो १३४ ग्रॅम गांजा, ३ लाख रूपयांची एक मारुती सुझुकी ग्रे रंगाची सेलेरीओ व्हीक्स आय चारचाकी जुनी वापरती कार, 15 हजार रुपयांचा रेडमी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट आणि १२ हजार रूपयांचा आपो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट पोलीसांनी जप्त केले आहेत.

या कारवाईमुळे दापोली शहरात गांजा विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही दापोली शहरात कोकंबाआळी येथे गांजविरोधात  कारवाई करण्यात आली होती.

या प्रकरणाची फिर्याद शांताराम रामचंद्र झोरे, वय ४६ वर्षे, पोहेका / स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी यांनी दिली आहे. दापोली तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीकडुन करण्यात आली आहे.